

केज : दहिफळ वडमाऊली (ता. केज) येथील भारतीय सैन्य दलातील जवान राजेंद्र विक्रम मुंडे यांचे ९ जानेवारी रोजी निधन झाले. दिल्ली येथील लष्कराच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी ११:०० वाजताच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मागील १३ वर्षा पासून राजेंद्र विक्रम मुंडे हे भारतीय सैन्य दलाच्या सिग्नल विभागात सेवेत होते. मागील आठ महिन्यापासून ब्रेनट्युमरने ग्रस्त होते. त्यांच्यावर दिल्ली येथील सैन्य दलाच्या लष्करी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र ९ जानेवारी रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव विशेष विमानाने दिल्ली येथून पुणे येथे आणण्यात आले. त्यानंतर लष्कराच्या रुग्णवाहिकेने त्यांचे पार्थिव मुळगाव दहिफळ येथे शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता आणण्यात आले. अंत्यदर्शनानंतर सकाळी १०.३० वाजता अंत्यविधीस्थळी नेण्यात आले. यावेळी अमर रहे अमर रहे जवान राजेंद्र मुंडे अमर रहे. अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी प्रशासनाच्या वतीने मंडळ अधिकारी विलास डोरले, पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे, माजी पंचायत समिती सदस्य पिंटू ठोंबरे, सरपंच अनिता दहिफळकर यांच्यासह माजी सैनिक, सैनिक कल्याण बोर्डाच्या वतीने पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहण्यात आली. जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जिल्हा पोलीस दलाच्या वतीने बंदुकीच्या फैरी हवेत झाडून मानवंदना दिली.