

माजलगाव: माजलगाव तालुक्यातील इरला (म) परिसरासह अनेक गावांना दि. २३ मे २०२६ रोजी सायंकाळी झालेल्या अवकाळी वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला. सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे परिसरातील जनजीवन काही काळ विस्कळीत झाले.
वादळी वाऱ्याच्या तडाख्याने आंबा, लिंब, चिंच यांसारखी मोठमोठी झाडे उन्मळून पडली असून अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेल्या आंब्याच्या बागांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
अनेक ठिकाणी फळांनी लगडलेली आंब्याची झाडे मुळासकट कोसळली, तर काही ठिकाणी झाडांच्या मोठमोठ्या फांद्या तुटून पडल्याने बागांचे मोठे नुकसान झाले. याशिवाय काही ठिकाणी वीजवाहिन्या खंडित झाल्या असून सोलार पंपाच्या सौर पॅनलचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती इरला येथील ग्रामस्थांनी दिली.
अवकाळी पावसासह आलेल्या या वादळी वाऱ्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान अधिक वाढले आहे. मागील काही दिवसांपासून वातावरणात होत असलेल्या बदलामुळे शेतकरी चिंतेत असतानाच या नैसर्गिक आपत्तीने त्यांच्या अडचणीत आणखी भर घातली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी बागांचे पंचनामे करून शासनाकडून तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. तसेच प्रशासनाने नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून तत्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.