परळी वैजनाथ : आईच्या निधनानंतर तिच्या विरहाने मुलाची मृत्यू झाल्याची घटना घडली. परळी येथील संत सावता महाराज मंदिर परिसरातील अनंतपुरे गल्लीमध्ये शुक्रवारी (दि.१३) घडली. आईच्या निधनानंतर दहाव्या दिवशी मुलानेही आपले प्राण सोडले. याघटनेनंतर परळीमध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तारामती लक्ष्मण शिंदे (वय.८०) यांचे 10 दिवसांपूर्वी निधन झाले होते. यानंतर आईच्या जाण्याचा धक्का सहन न झाल्याने बालाजी लक्ष्मण शिंदे (वय.५३) यांचे शुक्रवारी (दि.13) निधन झाले.
आईच्या निधनानंतर नवव्या दिवशी बालाजी यांना काहीसे अस्वस्थ वाटू लागले. यानंतर मित्र-परिवाराने त्यांना तातडीने परळीतील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. हृदयविकाराच्या संदर्भाने उपचार करण्यात आले. प्रकृतीत गुंतागुंत वाढत असल्याचे पाहून त्यांना पुढील उपचारासाठी लातूरला हलवण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्याच्यामेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याचे सांगितले. त्याच्यावर उपचार सुरु असतानाच शुक्रवारी बालाजी यांची प्राणज्योत मालवली. परळीत शनिवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात, पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे, बहीण, दाजी असा परिवार आहे.