Share Market Fraud | ४०० कोटींचा 'सिस्पे इन्फिनिटी' घोटाळा: मुख्य सूत्रधार राहुल काळोखेचे फिजीमधून भारतात प्रत्यार्पण, ११४ कोटींची मालमत्ता जप्त!

शेअर बाजारात आणि वेगवेगळ्या योजनांमध्ये जास्त परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक, सुमारे २१ हजार गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांना घातला होता गंडा
 मास्टरमाइंड राहुल शामराव काळोखे
मास्टरमाइंड राहुल शामराव काळोखे
Published on
Updated on

कडा : अहिल्यानगर (अहमदनगर), पुणे आणि बीड जिल्ह्यांसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या बहुचर्चित सिस्पे इन्फिनिटी आणि इनफिनाईट बिकन यात आर्थिक महाघोटाळ्याप्रकरणी मोठी कायदेशीर कारवाई झाली असून. शेअर बाजारात आणि वेगवेगळ्या योजनांमध्ये जास्त परताव्याचे आमिष दाखवून सुमारे २१ हजार गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या या कंपनीचा मुख्य मास्टरमाइंड राहुल शामराव काळोखे याला आंतरराष्ट्रीय पातळीवर कारवाई करून थेट फिजी देशातून अटक करण्यात आली आहे. इंटरपोलच्या साहाय्याने त्याला भारतात आणण्यात आले असून, मुंबई विमानतळावर आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) त्याचा ताबा घेतला आहे.

गुंतवणूकदारांची अशी झाली फसवणूक

सिस्पे इन्फिनिटी आणि तिच्याशी संलग्न कंपन्यांनी नागरिकांना 'फाइव्ह स्टार' बडेजाव दाखवून आकर्षित केले होते. शेअर मार्केट आणि इतर पोर्टफोलिओ मॅनेजमेंटच्या नावाखाली महिन्याला प्रचंड नफा देण्याचे खोटे आश्वासन देऊन लोकांकडून कोट्यवधी रुपये गोळा करण्यात आले. सुरुवातीला काही महिने परतावा देऊन गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला गेला, मात्र नंतर अचानक कोट्यवधी रुपये घेऊन मुख्य संशयित आरोपी देशाबाहेर फरार झाले होते. या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यासह विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.

११४ कोटी ९३ लाखांच्या मालमत्ता जप्तीला मंजुरी (MPID कारवाई)

अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी धडक कारवाई केली आहे. पोलिसांनी तपासादरम्यान आरोपींचे बँक खाती, शेअर मार्केटमधील डिमॅट खाती आणि स्थावर मालमत्ता गोठवली होती. राज्य शासनाने ११४ कोटी ९३ लाख रुपयांच्या मालमत्ता जप्तीच्या प्रस्तावाला 'एमपीआयडी' (MPID) कायद्यान्वये मंजुरी दिली आहे, ज्यामुळे फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तपासादरम्यान निष्पन्न झालेली एकूण मालमत्ता सुमारे २७८ कोटी रुपयांच्या घरात आहे.

५०० हून अधिक एजंट पोलिसांच्या रडारवर...

या आर्थिक गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे करत असून आतापर्यंत ४ संचालक आणि ८ एजंट अशा एकूण १२ प्रमुख आरोपींना गजाआड करण्यात आले आहे. ताज्या माहितीनुसार, कंपनीसाठी काम करणारे आणि ग्रामीण भागातून कोट्यवधींचा निधी गोळा करणारे सुमारे ५०० एजंट आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत.

राजकीय आणि प्रशासकीय पाठपुरावा

आरोपी राहुल काळोखे याने परदेशात पळ काढल्यानंतर त्याच्या विरोधात 'रेड कॉर्नर' नोटीस जारी करण्यात आली होती. स्थानिक खासदार नीलेश लंके यांनी या प्रकरणाचा दिल्लीत गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि सीबीआयकडे सातत्याने पाठपुरावा केला होता, ज्यामुळे या आंतरराष्ट्रीय अटकेला यश आले.

पोलीस प्रशासनाचे आवाहन:

"नागरिकांनी कोणत्याही अनधिकृत ॲप्स किंवा भरघोस परतावा देणाऱ्या भूलथापांना बळी पडू नये. शेअर बाजारात किंवा कुठेही गुंतवणूक करताना ती संस्था सेबी (SEBI) कडे नोंदणीकृत आहे का, याची खात्री करावी."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news