दिंद्रुड; पुढारी वृत्तसेवा: शाळेतून घरी आल्यानंतर जांभळे तोडण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना शिवणकाम करणाऱ्या एका मौलवीकडून जबर मारहाण करण्यात आली. यात एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याला बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. ही घटना दिंद्रुड (ता. माजलगाव) येथे सोमवारी (दि.८) सायंकाळी घडली. जखमी विद्यार्थ्याच्या आईच्या फिर्यादीवरून दोन व्यक्तींवर दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी एकास अटक केली असून एकजण फरार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिंद्रुड येथील तेजस नवनाथ कटारे व रत्नेश्वर रुस्तुम ठोंबरे या १३ वर्षीय विद्यार्थ्यांनी शाळा सुटल्यानंतर जिल्हा परिषद शाळेच्या बाजूला महेबूब सुभानी दर्गाजवळ असलेल्या जांभळीचे जांभळे पाडली. यावेळी मौलाना मुजीब मुज्जिद शेख ( दिंद्रुड, मूळ रा.वरफळ, ता.परतूर, जि.जालना) व समीर अत्तार कासम (रा. दिंद्रुड) या दोघांनी काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत तीन विद्यार्थी जखमी झाले. तर भीतीपोटी एक विद्यार्थी पळून गेला.
मौलानाने तेजस च्या डोक्यात काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. रत्नेश्वर ठोंबरे हा किरकोळ जखमी झाला. तेजसची आई वंदना कटारे यांच्या फिर्यादीवरून दिंद्रुड पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बी धीरज कुमार, सपोनि सुदाम शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेभाऊ राठोड करत आहेत.
तेजसच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे सिटीस्कॅन करून त्याला डॉक्टरांच्या निगराणीत ठेवले आहे. बीड येथील शासकीय रुग्णालयात सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.