

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या (Santosh Deshmukh Murder Case) आणि खंडणी प्रकरणी आज जवळपास तीन महिन्यांनंतर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde resigns) यांना मंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागले. नैतिकतेच्या आधारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून मुंडे यांनी आपला मंत्रीपदाचा राजीनामा दिला. संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची खंडणी प्रकरणातून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.
राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ही खंडणीच्या कारणामुळे करण्यात आली. देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे अत्यंत जवळचे सहकारी वाल्मीक कराड हेच जबाबदार असल्याचे सीआयडी तसेच एसआयटीच्या तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर वाल्मीक कराड यांचे 'आका' हे मंत्री धनंजय मुंडे हे असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी हिवाळी अधिवेशनापासून करण्यात आली होती. या मागणीस राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुहूर्त सापडला.
दरम्यान, या तीन महिन्यांच्या कालावधीत पुलाखालून भरपूर पाणी वाहून गेले. यात विरोधकांनी सरपंच देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यात आक्रोश मोर्चे काढले. शिवाय सुरुवातीस हे हत्या प्रकरण घडल्यानंतर या हत्याकांडातील मुख्य आका वाल्मिक कराड याला पोलिसांकडून अभय देण्यात आले होते. त्यामुळे या हत्याकांडाची राष्ट्रीय स्तरावर चर्चा झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी भेट घेवून या हत्याकांडबद्दल तत्काळ चौकशीचे आदेश देवून आरोपींच्या अटकेची मागणी केली. त्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली. याचदरम्यान राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन धनंजय मुंडे यांची राज्यमंत्रिमंडळात वर्णी लागली. धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने या हत्याकांडातील आरोपींना शासनाचे संरक्षण मिळाल्याची भावना विरोधकांसह भाजपच्या आमदारांनी केली. त्यामुळे या हत्याकांडाची सर्वत्र मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली.
जवळपास तीन आठवड्यानंतर या हत्याकांडाचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड (Walmik Karad) हा पोलिसांना शरण आला. वाल्मिक कराड शरण येताच या प्रकरणाची सीआयडी, एसआयटीमार्फत चौकशी करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात जाहीर केले. या प्रकरणाची वरिष्ठ पोलीस संचालकपदाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात आली. याचदरम्यान न्यायालयीन चौकशीची विरोधकांनी केलेली मागणीदेखील त्यांनी मान्य करून चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश दिले.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या तिन्ही चौकशी समितीवर विरोधकांनी समाधान व्यक्त केले. मंत्री धनंजय मुंडे यांचे आणि या हत्याकांड आणि खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड यांचे अत्यंत घनिष्ट संबंध आहेत. तसेच ते अनेक कंपन्यांमध्ये भागीदारदेखील आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला तरच या हत्याकांडाची निपक्षपातीपणे चौकशी होईल अशी मागणीदेखील वेळोवेळी केली. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी हत्याकांडातील एकही आरोपीला सोडले जाणार नाही मग तो कितीही मोठा असला तरी...! असा इशारा दिला. परंतु राजीनाम्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंडे यांच्या विरुद्ध कुठलाही पुरावा नाही. त्यांचा या घटनेशी संबंध नाही असे सांगून राजीनामा घेणार नाही असे सातत्याने सांगितले. तसेच धनंजय मुंडे यांनीदेखील मुख्यमंत्री फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले तर लगेच राजीनामा देईन असे वारंवार सांगितले.
या आरोप प्रत्यारोपांच्या फैरीत सीआयडी तसेच एसआयटीने जवळपास १५०० पानांचे आरोपपत्र केज येथील मकोका न्यायालयात सादर केले. या आरोपपत्रात हत्याकांड आणि खंडणीतील मुख्य आरोपी हा वाल्मिक कराड हाच असून तपासादरम्यान जवळपास १५ पेक्षा जास्त मोबाईल जप्त करण्यात आले. या मोबाईलमध्ये हत्या करण्यापूर्वी तसेच झाल्यावर काही व्हिडिओ तसेच सेल्फी घेतल्याचे आढळून आले. हे फोटो, व्हिडीओ हे एवढे भयानक आहेत की सर्वसामान्य व्यक्तीला ते बघावसेदेखील वाटत नाहीत. शिवाय मृत्यूनंतर सरपंच संतोष देशमुख यांच्या मृतदेहाची विटंबदेखील करण्यात आल्याचे यात म्हटले आहे. यात काही ठोस पुरावे हे तपास यंत्रणेला मिळाले असून आरोपपत्रातील फोटो, व्हिडिओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे किती क्रूरतेने सरपंच देशमुख यांची हत्या करण्यात आली हे सर्वांसमोर आले. लोकांच्या भावनेचा उद्रेक झाला. बीड जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र या हत्याकांडाबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी वाढू लागली. काल उशिरा मध्यरात्री मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची बैठक झाली. या बैठकीत धनंजय मुंडे यांनी आपल्यापदाचा राजीनामा द्यावा असे सांगण्यात आले.
अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांसह स्वपक्षीयांनी राजीनाम्याची मागणी लावून धरली. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी धनंजय मुंडे यांना आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सोपवला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंडेंचा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी राज्यपाल यांच्याकडे पाठविला असल्याचे सांगितले.
संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन मंत्री मुंडे यांना पायउतार व्हावेच लागले. एवढेच नाही तर मीडिया ट्रायलादेखील सामोरे जावे लागले. या हत्याकांड प्रकरणी पहिली सुनावणी १२ मार्च अशी असून राज्य शासनाने या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे. निकम हे पहिल्या सुनावणीपासून हा खटला लढविणार आहेत.
सरपंच संतोष देशमुख हत्याकांड हे खंडणीपासून सुरु झाले आणि ते थेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यापर्यंत पोहोचले. या दरम्यान राज्यात विरोधकांसह ग्रामस्थांना न्याय हक्कासाठी आंदोलने करावी लागली. आता प्रतीक्षा आहे ती आरोपींना शिक्षा सुनावण्याची! न्यायदेवता आम्हाला नक्की न्याय देईल, अशी अपेक्षा देशमुख कुटुंबियांना आहे...!