

बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग सरपंच हत्याप्रकरणी कुणालाही सोडले जाणार नाही. जिल्ह्यातच नाही, तर राज्यात देखील अत्याचार खपवून घेतला जाणार नाही, तो कितीही मोठा असू दे, कायद्याच्या पुढे मोठा नाही, असा सज्जड दमच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आष्टी येथे आज (दि.५) दिला. बीड जिल्ह्यातील खुंटेफल येथील विविध विकास कामाच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'आष्टी उपसा सिंचन योजना क्र. 3 अंतर्गत येणार्या शिंपोरा ते खुंटेफळ पाईपलाईन' कामाची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते कोनशिला अनावरण, विधिवत पूजन करून तसेच रिमोटद्वारे कळ दाबून बोगदा कामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी बोलताना म्हणाले की, राज्यात येथून पुढे अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत. या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. तपासात कोणीही आढळून आले तरी त्याला सोडणार नाही. मात्र, तपास यंत्रणा काम करत असताना बाकीच्यांनी नाहक या बाबत सनसनीखेज वक्तव्य करू नये, असे सांगून कुणालाही माफी दिली जाणार नाही. (Devendra Fadnavis)
याबरोबरच बीड जिल्ह्यातील वैभवशाली परंपरेची आठवण करून देत याच जिल्ह्याने अठरा पगड जाती धर्माच्या व्यक्तींना निवडून दिले आहे. हा सामाजिक समतोल सर्वांनीच सांभाळावा, असा सल्ला देताना विकासाला जात धर्म नसतो. तसेच गुन्हेगाराला देखील जात, धर्म नसतो. पुढील काळात बीड जिल्ह्याची मोठी परंपरा आपण सगळ्यांनी सांभाळावी, असे आवाहन त्यांनी केले.
आ.सुरेश धस म्हणाले की, मागील काळात जिल्ह्यात भ्रष्टाचार, खून, दरोडे अशा अनेक घटना मोठ्या प्रमाणावर होत होत्या. या घटनांना कायमस्वरूपी आवर घालण्याची विनंती करून यावर कायमचा बंदोबस्त करण्याची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी केली. अलीकडच्या काळात जी भ्रष्टाचाराचे प्रकरणे बाहेर येत आहेत. त्यावर भूमिका घ्यावी, असे मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव न घेता टोला लगावला.
मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, गेल्या अनेक दिवसांपासून बीड जिल्ह्याची बदनामी मोठ्या प्रमाणावर होत आहे. बीड जिल्ह्याची वैभवशाली परंपरा असून या जिल्ह्याने अठरापगड जातीच्या लोकप्रतिनिधींना केवळ त्यांच्या कामावर त्यांना निवडून दिलेले आहे. जिल्ह्यातील सामाजिक समतोल बिघडला आहे. जिल्ह्याची बदनामी काही लोक जाणीवपूर्वक करत आहेत.
गोपीनाथ मुंडेंची लेक आहे, दिल्या शब्दाला कायम जागत आले असून शब्दाला कोण जगले नाही, हे ज्याने त्याने ठरवावे, असे त्या म्हणाल्या. आष्टी, पाटोदा, शिरूर मतदारसंघाचा विकास कसा केला, हे सांगून माझा पराभव का झाला? हे सर्वांना माहीत आहे, अशी खंत व्यक्त केली.