

गौतम बचुटे/ केज :
केज संतोष देशमुख हत्याकांडा प्रकरणाशी ज्या खंडणी प्रकरणाचा सबंध जोडला जात आहे; त्या खंडणी प्रकरणातील सीआयडीच्या ताब्यात असलेला संशयित आरोपी विष्णू चाटे याला तपासासाठी केज पोलीस ठाण्यात आणण्यात आलेले आहे.
या बाबतची अधिक माहिती अशी की, मस्साजोग ता. केज येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या दि. ९ डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. त्या पूर्वी आवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दोन कोटी रूपयांची खंडणी मागण्यासाठी गेलेला विष्णू चाटे याने वाल्मीक कराड यांचे आवादा एनर्जीच्या अधिकाऱ्यांशी बोलणे झाले होते. संतोष देशमुख यांच्या हत्त्येनंतर विष्णू चाटे हा देखील फरार झाला होता. त्या नंतर तब्बल दहा दिवसांनी म्हणजे १९ डिसेंबर रोजी विष्णू चाटे याला पोलिसांनी बीड येथून ताब्यात घेतले होते; असे पोलीस सांगत असले तरी विष्णू चाटे मात्र स्वतः हजर झाला असल्याची चर्चा आहे.
खंडणी प्रकरणी विष्णू चाटे याला १० जानेवारी पर्यंत वाढीव सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे. तो सध्या सीआयडी कोठडीत पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याने गुन्ह्यात वापरलेला मोबाईल हस्तगत करण्यासाठी आणि इत्तर माहितीसाठी दि. ८ जानेवारी रोजी दुपारी १२:०० वाजण्याच्या सुमारास सीआयडीच्या पथकाने त्याला केज पोलीस ठाण्यात आणले आहे. सुमारे तीन तासांपासून विष्णू चाटे याला केज पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलेले आहे.