

केज : बड्या नेत्यांच्या निकटवर्तियांना वाचविण्यासाठी त्यांना हत्येच्या गुन्ह्यात आणि मोक्कामध्ये घेतले जात नाही. ते आरोपी जर सुटले तर आमच्या जीवाला धोका असल्याने आम्ही टॉवर वरून उड्या मारून जीवन संपवू, असे संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी सांगितले.
या बाबतची माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना उलटून गेला आहे. या हत्या प्रकरणातील आठ आरोपींना मोक्का लावण्यात आला आहे. परंतु खंडणी प्रकरणातील सीआयडीच्या कोठडीत असलेला मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच एक आरोपी फरार आहे. त्यामुळे मयत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे की, दि. १३ जानेवारीला आम्ही सर्व कुटुंबीय टॉवरवरून उड्या मारून स्वतःचे जीवन संपविणार आहेत. याप्रकरणातील आरोपी सुटले तर देशमुख कुटुंबीय आणि गावकऱ्यांच्या जीविताला धोका आहे. त्यांच्या या बोलण्यातून तपास यंत्रणा आणि सरकार यांच्या बाबतीत नाराजी आणि संशय व्यक्त होत आहे.