

National Yogasana Championship Samarth Dhokte
परळी वैजनाथ : युवा आणि क्रीडा विकास संघटना (भारत) यांच्यावतीने अमृतसर पंजाब येथे आयोजित करण्यात आलेल्या ओपन नॅशनल चॅम्पियनशिप 2025 मध्ये परळीच्या मुलाने भरीव कामगिरी केली. राष्ट्रीय स्तरावरील योगासन स्पर्धेत त्याने प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक जिंकले. या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
युवा आणि क्रीडा विकास संघटना (भारत) यांच्या वतीने अमृतसर (पंजाब) येथे ३० व ३१ डिसेंबर २०२५ रोजी ओपन नॅशनल चॅम्पियनशिप 2025 स्पर्धा घेण्यात आल्या. राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत महाराष्ट्रातून स्पर्धक म्हणून सहभागी स्पर्धक समर्थ मनोज धोकटे याने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले. राष्ट्रीय स्तरावर झालेल्या या स्पर्धेत देशभरातून स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत समर्थ धोकटे याने सुवर्णपदक पटकावत परळीचे नाव उंचावले आहे. परळी येथील व्यावसायिक मनोज धोकटे यांचा तो मुलगा असून कैलास विष्णुपंत धोकटे यांचा समर्थ हा पुतण्या आहे.
या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातून अनेक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत समर्थ मनोज धोकटे याने आपल्या कौशल्य, सातत्यपूर्ण सराव आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश संपादन केले. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.