

केज: केज तालुक्यातील साळेगाव येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध दारूविक्रीवर धाड टाकून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला. मात्र, अवैध दारूविक्री करणारा संशयित पोलिसांना चकवा देत घटनास्थळावरून फरार झाला.
दि. २२ मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने, पोलिस हवालदार राजू पठाण, महेश जोगदंड, घोडके व मराडे हे पोलिस निरीक्षक बंटेवाड यांच्या आदेशानुसार केज पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी गस्त घालत होते. यावेळी त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, विशाल हरीश गित्ते (रा. साळेगाव, ता. केज) हा साळेगाव चौकात विनापरवाना बेकायदेशीररित्या देशी दारूची विक्री करत आहे.
मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सकाळी सुमारे ७.३० वाजता साळेगाव येथे छापा टाकला. पोलिसांना पाहताच संबंधित व्यक्तीने देशी दारूचे बॉक्स जागीच टाकून पळ काढला. चौकशीअंती फरार झालेला इसम विशाल हरीश गित्ते असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी पोलिस हवालदार महेश जोगदंड यांच्या फिर्यादीवरून विशाल हरीश गित्ते याच्याविरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१३/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बाबासाहेब बांगर हे करीत आहेत.