

Sale of fake urad seeds in Dhamangaon
आष्टी, पुढारी वृत्तसेवा : शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बनावट बियाणे विक्रेत्यांविरोधात कृषी विभागाने धामणगाव (ता. आष्टी) येथे मोठी कारवाई करत 115 किलो उडीद बियाण्यांचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी संबंधित विक्रेत्याविरोधात आष्टी पोलिस ठाण्यात विविध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धामणगाव येथील शिवशंभो कृषी सेवा केंद्राचे प्रोप्रायटर भूषण बाळाजी बोराडे हे निर्मल सिड्स कंपनीच्या नावाने बनावट उडीद बियाण्यांची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाला मिळाली होती. त्यानुसार भरारी पथकाने सापळा रचून संशयित वाहनाचा पाठलाग केला. झालेल्या झटापटीनंतर वाहनातून 23
पिशव्यांमध्ये भरलेले एकूण 115 किलो उडीद बियाणे जप्त करण्यात आले. या प्रकरणी कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) नागसेन शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी भूषण बाळाजी बोराडे (रा. धामणगाव, ता. आष्टी) याच्याविरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955, बियाणे नियंत्रण आदेश 1983, बियाणे कायदा 1966 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई मोहीम अधिकारी सयाप्पा गरांडे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक वल्लभभोसले, तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे आणि कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) नागसेन शिंदे यांच्या पथकाने केली. दरम्यान, खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बनावट बियाणे, खते व कीटकनाशकांची विक्री रोखण्यासाठी कृषी विभागाने जिल्हाभर विशेष मोहीम सुरू केली असून शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावे, तसेच संशयास्पद व्यवहार आढळल्यास तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही कारवाई कृषी संचालक (निविष्ठा व गुणवत्ता नियंत्रण) सुनील बोरकर, विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रविण देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे आणि कृषी विकास अधिकारी साहिल सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.