

Rural Hospital in Dharur Taluka on 'Ventilator' (in critical condition)
धारूर, पुढारी वृत्तसेवा : धारूर तालुक्यातील गरिबांचे पोरके झालेले ग्रामीण रुग्णालय सध्या स्वतःच 'व्हेंटिलेटर' वर असल्यासारखे भासत आहे. येथील आरोग्य सेवा पूर्णपणे कोलमडली असून, तज्ज्ञ डॉक्टरांच्या कमतरतेमुळे रुग्णांना अक्षरशः वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. एकीकडे सामान्य जनता उपचाराअभावी तडफडत असताना, दुसरीकडे स्वतःला 'आरोग्यदूत' म्हणवून घेणारे आणि जनतेचे 'लाडके' लोकप्रतिनिधी मात्र कुंभकर्णी झोपेत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धारूर ग्रामीण रुग्णालयात सध्या केवळ दोनच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. तालुक्यातील हजारो रुग्णांचा भार या दोघांवरच असल्याने त्यांच्यावर कामाचा प्रचंड अतिरिक्त ताण पडत आहे. २४ तास सेवा देताना या डॉक्टरांचीही मानसिक घुसमट होत आहे. 'वरचे' अधिकारी आणि लोकप्रतिनिधी मात्र एसी केबिनमध्ये बसून फक्त आदेश सोडण्यात मग्न आहेत, तर प्रत्यक्ष काम करणाऱ्या डॉक्टरांना कसलीही मदत मिळत नाहीये.
रुग्णालयातील सर्वात मोठा विनोद म्हणजे, सुमारे १५ ते २० दिवसांपूर्वी येथे डॉ. पारखे यांची बदली झाल्याचे ढोल वाजवले गेले. मात्र, हे महाशय अद्याप रुग्णालयात रुजू झालेले नाहीत. त्यांची बदली कागदावरच राहिली की त्यांना धारूरला येण्याची अलर्जी आहे, असा सवाल नागरिक विचारत आहेत. बदली होऊनही रुजू न होणाऱ्या डॉ. पारखे यांना कोणाचा राजकीय वरदहस्त आहे? प्रशासनाचा त्यांच्यावर वचक नाही का? या बाबत विचारणा होत आहे.
रुग्णालयाचे प्रशासकीय कामकाज कोणाच्या हाती आहे, हे समजायला मार्ग नाही. कायमस्वरूपी वैद्यकीय अधीक्षक नसल्याने येथे 'प्रभारी' राज सुरू आहे. प्रभारी अधिकारी तरी नियमित उपलब्ध असतात का, याबाबतही नागरिकात संभ्रम आहे. रुग्णालयावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने कर्मचाऱ्यांमध्येही मनमानी कारभार सुरू असल्याची चर्चा आहे.
आमदार प्रकाश सोळुंके यांचे 'मौन' कधी सुटणार ?
निवडणुकीपुरते हात जोडून येणारे आमदार प्रकाश सोळुंके सध्या कुठे आहेत ? त्यांच्या मतदारसंघातील मुख्य आरोग्य केंद्र इतक्या दयनीय अवस्थेत असताना ते गप्प का आहेत? तालुक्यातील जनतेने त्यांना निवडून दिले ते फक्त सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मिरवण्यासाठी की आरोग्य, शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी? आमदारांनी तत्काळ आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन धारूर रुग्णालयासाठी तज्ज्ञ डॉक्टर, पुरेसे कर्मचारी आणि आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून द्यावी, अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
आरोग्यदूत 'फक्त स्टेजवरच !
स्वतःला 'आरोग्यदूत' म्हणून मिरवणारे आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत ओळख असल्याचे भासविणारे डॉ. ओमप्रकाश शेटे सध्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनात आणि उद्घाटनात प्रचंड व्यस्त आहेत. 'स्टेज'वर उभं राहून आरोग्यावर मोठमोठी भाषणे ठोकणे सोपे असते, पण प्रत्यक्ष जमिनीवर उतरून रुग्णांची सेवा करणे वेगळे असते असा सल्ला धारूरकर यांनी त्यांना दिला आहे.