

Raid on sweets factory in Keg
केज, पुढारी वृत्तसेवा : राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशाने बीड जिल्ह्यातील केज शहरालगत सुरू असलेल्या एका मिठाई आणि पेढे तयार करीत असलेल्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करून भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक यांच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने परवाना निलंबित केला तसेच तेथे तयार करण्यात येत असलेल्या मिठाईचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले अडून ६ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला असल्याने केज तालुक्यात खळबळ माजली आहे.
बीड जिल्ह्यातील केज येथे केज मांजरसुंबा रोडवर केज पासून सुमारे ६ किमी अंतरावर गंगा माऊली साखर कारख्याच्या समोर, उमरी फाटा येथे गट नंबर ७८/१ मध्ये चौरे यांचा विशाल डेअरी नावाचा दुग्धजन्य पदार्थ बनविण्याचा कारखाना आहे. दि. १७ जून रोजी महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशाने छत्रपती संभाजी नगर विभागाचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त व्ही. व्ही. पाटील, सहआयुक्त एस आर करकळे आणि अन्न सुरक्षा अधिकारी ए डी नरवाडे, अभय गाढे, एस एस खंदारे, प्रशांत कुचेकर यांनी त्यांना मिळालेल्या माहिती वरून विशाल डेअरीवर धाड टाकली. त्यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना कारखान्यात प्रचंड घाण व तेथे तयार करण्यात आलेल्या अन्न पदार्थ हे कमी दर्जाचे आणि भेसळयुक असल्याचे आणि तेथे माशा, कीटक यांचा प्रादुर्भाव आढळून आला.
तसेच तेथे जाळी, जळमटे, फरशी फुटून त्यात अस्वच्छता साचलेली घाण आढळून आली. तयार करण्यात आलेल्या अन्न पदार्थ आणि मिठाई या भारतीय अन्न सुरक्षा मानक आणि प्राधिकरण यांचे नियम पायदळी तुडवून नियमा नुसार लेबलिंग आढळली नाही. हलवा व कलाकंद बनवण्यासाठी वापरण्यात येणार द्रव स्वरूपातील ग्लुकोजची अस्वच्छ स्थितीत साठवणूक करून ठेवली. होती. तर खवा व इतर कच्च्या मालाची बिले आढळून आली नाही. यामुळे विशाल डेअरीमध्ये बनिवलेल्या पदार्थावर माशा व अस्वच्छतेच्या कारणामुळे विशाल डेअरीचा परवाना निलंबित केला. यामुळे केज तालुक्यासह बीड जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
दरम्यान भारतीय अन्न सुरक्षा मानक आणि प्राधिकरण २००६ चे कलम २६, २७ अन्न पदार्थात भेसळ आणि कमी दर्जाचे असल्याच्या कारणावरून येथील द्रव स्वरूपातील ग्लुकोज, सुटा खवा, सूर्या गोल्ड वनस्पती तेल, प्रिमीयम गोल्ड हलवा (व्हाईट राधा कृष्ण), प्रिमीयम गोल्ड हलवा (ब्राऊन राधा कृष्ण), इंडियन स्वीट असे एकूण ६६८४०९ रु. चा मुद्देमाल ताब्यात घेऊन त्याचे नमुने प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत.
यापूर्वीही झाली होती दोनदा कारवाई
१) या पूर्वी दि. १६ जून २०१९ रोजी या ठिकाणी विशाल डेअरी नावाच्या बनावट खव्यावर अन्न व भेसळ विभागाने कार्यवाही करून ९ लाख ६५ हजार ९०० रु चा मुद्देमाल जप्त केला होता.
२) २४ नोव्हेंबर २०२१ मध्ये तत्कालीन सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी धाड टाकली त्यावेळी तेथे दुधाच्या पावडर मध्ये रुची तेल टाकून त्या पासून बनावट खवा तयार करून त्याची विक्री होत असल्याची माहिती वरून केलेल्या कारवाईत ५ लाख ३७हजार ४८० रु किमतीचा २ हजार ९५८ किलो ग्रॅम बनावट खवा ताब्यात घेतला होता.
कारवाईनंतर बदले होते नाव
सन २०१९ मध्ये अन्न सुरक्षा मानक कायदा सन-२००० अंतर्गत संबंधीत विशाल डेअरीवर कार्यवाही झाली होती. परंतु पुन्हा त्याच ठिकाणी विशाल डेअरी ऐवजी व्हर्टिकल फूड्स नावाने बनावट खवा तयार करून गोरखधंदा सुरू केला होता.