Laxman Hake | जीव वाचवण्यासाठी कुऱ्हाड वापरा, अन्याय सहन करू नका : प्रा. लक्ष्मण हाके

आरोपींना चार दिवसांत अटक न झाल्यास माजलगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशारा
Laxman Hake
Laxman Hake | जीव वाचवण्यासाठी कुऱ्हाड वापरा, अन्याय सहन करू नका : प्रा. लक्ष्मण हाकेPudhari
Published on
Updated on

माजलगाव : राज्यात मेंढपाळांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या घटनांबाबत तीव्र संताप व्यक्त करत ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी धनगर समाज बांधवांना अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले. “महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार मेंढपाळांवर हल्ल्याच्या घटना घडत आहेत. समाज बांधवांनी अन्याय सहन करू नये. आपल्या हातात मेंढ्यांसाठी वापरली जाणारी कुऱ्हाड गरज पडल्यास स्वतःचा जीव वाचवण्यासाठी वापरा. मी चिथावणी देत नाही, तर जबाबदारीने बोलत आहे,” असे विधान त्यांनी केले.

माजलगाव तालुक्यातील घळाटवाडी येथे मेंढपाळ बांधवांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रा. हाके यांनी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यास भेट देत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. “पोलिसांचा धाक आरोपींवर राहिलेला दिसत नाही. समाजाच्या न्यायासाठी आवाज उठवणारे आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत,” असेही त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

यावेळी प्रा. हाके यांनी मारहाणीत जखमी झालेल्या बीटे बंधूंच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांना धीर दिला. न्याय मिळवून देण्यासाठी आपण त्यांच्या पाठीशी उभे राहू, असा विश्वास त्यांनी कुटुंबीयांना दिला. बीटे बंधूंच्या आजोबांनी भावना व्यक्त करताना “आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही तो सहन करणार नाही,” असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपींना चार दिवसांत अटक करून कठोर कारवाई करावी, अन्यथा धनगर समाजाच्या वतीने माजलगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा प्रा. लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी चर्चा सुरू असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

या आंदोलनात माधवराव निर्मळ, शारदाताई पांढरे, माऊली सिरसट, पवन करवर, सुनील ढाकणे, सुमंत धस, विलास नेमाने, अशोक ढोणे, विजय धाईगुडे, रामेश्वर शिंदे, किशोर पांचाळ, शंकर गावडे, शामसुंदर पांचाळ, दत्ता आबुज, जगन्नाथ शिंदे यांच्यासह अनेक समाज बांधव सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news