असाही बीडचा इतिहास! बीडमधील प्रमोद महाजन, मुंडे यांनी राजकारणात उमटविला ठसा

Beed | धनगर समाजाचा खासदार, पहिली महिला लोकसभेत पाठविणारे बीडकरच
Beed
प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, केशरकाकू क्षीरसागर, मकरंद अनासपुरे. (file photo)
Published on
Updated on
छत्रपती संभाजीनगर : उमेश काळे

बीड जिल्ह्यातील काही भागात अलिकडच्या काळातील काही घटना निश्‍चितच चिंतेच्या आहेत जरूर. पण त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याची बदनामी करणे कितपत योग्य आहे? समाजजीवनातील विविध क्षेत्रात बीडचे योगदान विसरावे की काय? राजकारण, क्रीडा, सांस्कृतिक, शिक्षण, सामाजिक सेवांमध्ये प्रभावी ठसा बीडने उमटविला आहे.

बीड म्हटले की भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन (Pramod Mahajan) आणि गोपीनाथराव मुंडे (Gopinath Munde) यांचे नाव चटकन नजरेस येते. महाजनांचा जन्म तसा तेलंगणातील महेबूबनगरचा. धाराशिव येथून महाजन कुटुंब अंबाजोगाईत स्थायिक झाले. तेथेच त्यांचा संघाशी संबंध आला. योगेश्‍वरी विद्यालय, महाविद्यालयात शिक्षण घेतल्यानंतर काही काळ ते अंबाजोगाईत खोलेश्‍वर विद्यालयात शिक्षक होते. कालांतराने त्यांना जनसंघाची जबाबदारी देण्यात आली. त्यांची कामाची चुणूक पाहून त्यांना प्रदेशात घेण्यात आल्यानंतर ते मुंबईत स्थायिक झाले. भाजपमध्ये केंद्रस्तरापर्यंत संघटनात्मक जबाबदार्‍या, मंत्रिपदे सांभाळणार्‍या महाजनांनी देशपातळीवर अढळ स्थान निर्माण केले.

भाजपचे तरुण अध्यक्ष

गोपीनाथराव मुंडे यांचा जन्म परळीजवळ असणार्‍या नाथ्य्राचा. अंबाजोगाईत योगेश्‍वरीमध्ये शिक्षणासाठी आल्यानंतर त्यांचा प्रमोद महाजनांशी मैत्री झाली आणि या मैत्रीचे रूपांतर नात्यातही झाले. मुंडे यांच्यातील नेतृत्व गुण हेरून पक्षाने त्यांना युवा मोर्चाची जबाबदारी दिली. 1986 मध्ये नागपूर येथे झालेल्या अधिवेशनात त्यांना प्रदेशाध्यक्षपद सोपविण्यात आले. ते भाजपचे सर्वांत तरुण प्रदेशाध्यक्ष (वय 37) ठरले. विरोधी पक्षनेते, उपमुख्यमंत्री, केंद्रात ग्रामीण विकास मंत्री अशा जबाबदार्‍या मुंडे यांनी सांभाळल्या. भाजप- शिवसेना युती घडविण्यात वाटा असलेल्या या नेत्यांनी देश, राज्यात तळागाळापर्यंत पक्षाचा झेंडा रोवला.

धनगर समाजाचा पहिला खासदार

धनगर समाजाचे रखमाजी पाटील गावडे हे दुसर्‍या लोकसभेवर निवडून गेले. या समाजातून लोकसभेवर गेलेले ते पहिले खासदार होत. केशरकाकू क्षीरसागर यांच्या रूपाने मराठवाड्यातून पहिल्या महिला खासदार देण्याचे काम बीडने केले. मुक्‍तिलढ्यात भाग घेतलेल्या बाबासाहेब परांजपे, व्दारकादास मंत्री यांनाही लोकसभेत बीडकरांनी संधी दिली होती. रजनी पाटील, बबनराव ढाकणे, जयसिंगराव गायकवाड, प्रीतम मुंडे यांनाही बळ दिले. सातार्‍याचे क्रांतीसिंह नानासाहेब पाटील हे बीड मतदारसंघातून 1967 च्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाले होते. बीडने राज्याला सुंदररराव सोळंके व गोपीनाथराव मुंडे हे दोन उपमुख्यमंत्री दिले, हे विशेष.

क्रीडा, सिने क्षेत्रात कामगिरी

बीडच्या मांडवा येथील रहिवासी असलेल्या अविनाश साबळे यांनी ऑलम्पिक क्रीडा स्पर्धेत ट्रिपल चेस या प्रकारात अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. पाटोदा तालुक्यातील संजय बांगर यांनी क्रिकेट जगतात आपले नाव गोंदविले आहे. बीडचे भूमिपुत्र असणारे मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) हे विनोदी अभिनेते म्हणून मराठी चित्रसृष्टीत परिचित झाले आहेत. एसटीचे ब्रँड अ‍ॅम्बिसडर म्हणून त्यांची ओळख आहे. खास मराठवाडा शैलीत असणारी संवादफेक लक्षवेधी ठरते. माजलगावच्या संदीप पाठकने सिने, नाट्य क्षेत्रात आपली छाप पाडली आहे. प्रा. लक्ष्मण देशपांडे यांच्या ’वर्‍हाड निघालं लंडनला’ चे सादरीकरण ते अतिशय प्रभावीपणे करतात.

Beed
असाही इतिहास! बीडचे ऐतिहासिक, सांस्कृतिक वैभव दीपवून टाकणारे!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news