

केज : केज तालुक्यातील सातेफळ येथील राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या नावाने असलेल्या चौकातील भगवान बाबांच्या फोटोची एका व्यक्तीने बुधवारी रात्री फाडून विटंबना केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातेफळ येथे राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या नावाने चौक असून चौकात भगवान बाबा यांचा फोटो लावलेला आला होता. बुधवारी रात्री एका व्यक्तीने बाबांच्या फोटोची विटंबना करीत जाणून बुजून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या निंदनीय व गंभीर प्रकारामुळे भगवान बाबांना मानणाऱ्या भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच युसुफवडगाव ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले. तर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी या प्रकारची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे हे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, या प्रकाराची दखल घेऊन सदर समाजकंटकास तात्काळ अटक करून कडक कारवाई करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.