

पाटोदा : तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विशेष बाब म्हणून मंजूर केलेल्या निधीतून पाटोदा पंचायत समितीसाठी भव्य व सुसज्ज प्रशासकीय इमारत उभी राहिली आहे. मात्र, प्रशासकीय अनास्था आणि नियोजनाच्या अभावामुळे ही इमारत गेल्या दोन ते तीन वर्षांपासून वापरात येऊ शकलेली नाही. तब्बल 3 कोटी 70 लाख रुपये खर्च करूनही केवळ विद्युतीकरणाचे काम अपूर्ण असल्याने ही इमारत सध्या धूळखात पडल्याचे वास्तव समोर आले आहे.
पाटोदा पंचायत समितीच्या नूतन इमारतीसाठी 3 कोटी 70 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून इमारतीचे बांधकाम आणि विद्युतीकरणाची कामे ठराविक कालावधीत पूर्ण करणे अपेक्षित होते. इमारतीचे सिमेंट-काँक्रिट व इतर बांधकाम पूर्ण झाले असून, प्रशासकीय दृष्ट्या ती वापरास तयार आहे. मात्र, तांत्रिक कारणांमुळे विद्युतीकरणाचे काम वेळेत पूर्ण झाले नाही.दरम्यानच्या काळात संबंधित टेंडरची मुदत संपल्याने आता विद्युतीकरणासाठी नवीन निविदा प्रक्रिया राबवावी लागणार असल्याचे जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून सांगण्यात येत आहे.
परिणामी, पूर्ण झालेली इमारत असूनही तिचा उपयोग होऊ शकलेला नाही. बांधकाम विभागाकडून इमारतीचे काम पूर्ण झाल्याचा दावा करण्यात येत असून, ती पंचायत समितीकडे हस्तांतरित करण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र, विद्युतीकरण पूर्ण झाल्याशिवाय इमारत ताब्यात घेणार नाही, अशी ठाम भूमिका पंचायत समिती प्रशासनाने घेतली आहे.
गटविकास अधिकारी उद्धव सानप यांनी स्पष्ट केले की, काम पूर्ण झाल्यावरच इमारत अधिकृतपणे ताब्यात घेतली जाईल. त्यामुळे सध्या ही इमारत कागदोपत्री एका विभागाकडे, तर प्रत्यक्षात कोणाच्याच ताब्यात नसल्याची विचित्र स्थिती निर्माण झाली आहे.इमारत उभी राहून दोन-तीन वर्षे उलटली असतानाही स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी किंवा संबंधित यंत्रणांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिल्याचे दिसत नाही.
कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊनही कारभार अजूनही जुन्याच, अपुऱ्या सुविधांच्या इमारतीतून चालवावा लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. केवळ वीज पुरवठा नसल्याच्या कारणावरून ही इमारत ओसाड पडून राहणे म्हणजे सरकारी निधीचा अपव्यय असल्याची भावना व्यक्त होत आहे.
इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र, विद्युतीकरणाचे काम अपूर्ण असल्याने इमारत अद्याप पंचायत समितीकडे अधिकृतपणे हस्तांतरित करण्यात आलेली नाही. हे काम पूर्ण झाल्यानंतरच आम्ही इमारतीचा ताबा घेणार आहोत असे गटविकास अधिकारी उध्दव सानप यांनी सांगितले.