Parli Vaijnath news | परळीच्या ऐतिहासिक राणी लक्ष्मीबाई टॉवरचे प्रवेशद्वार केले बंद

कराड समर्थकांच्या आंदोलनामुळे प्रशासनाचा निर्णय
Parli Vaijnath Rani Laxmibai Tower Entrance closed
परळीच्या ऐतिहासिक राणी लक्ष्मीबाई टॉवरचे प्रवेशद्वार केले बंद file photo
Published on
Updated on

परळी वैजनाथ : शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेले व ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या राणी लक्ष्मीबाई टॉवरवर जाण्यासाठीचा मार्ग आणि प्रवेशद्वार नगरपरिषद प्रशासनाने आज तात्पुरता बंद केला आहे. वाल्मीक कराड यांच्या समर्थनार्थ मंगळवारी झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

मस्साजोग येथील आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणात संशयित आरोपी असलेले वाल्मीक कराड याच्या समर्थकांनी काल दिवसभर परळी शहरात विविध प्रकारची आंदोलने केली होती. कराड समर्थक आक्रमक होत परळी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ऐतिहासिक राणी लक्ष्मीबाई टॉवरवर चढले होते. राणी लक्ष्मीबाई टॉवरवर जाण्यासाठी एक प्रवेशद्वार असून या प्रवेशद्वारातूनच हे आंदोलनकर्ते टॉवरच्या शिखरापर्यंत गेले होते. अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी उपाययोजना म्हणून नगर परिषद प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात या प्रवेशद्वाराला पत्रे ठोकून बंद केले आहे.

नगरपरिषदेचे वरातीमागून घोडे

गेल्या अनेक वर्षापासून राणी लक्ष्मीबाई टॉवरच्या प्रवेशद्वाराला दरवाजा आहे. या दरवाजाला पूर्वी कुलूपही लावलेले असायचे तसेच न.प.कडून देखभालीसाठी कर्मचारीही नियुक्त असायचा. मात्र गेल्या काही वर्षात हे कुलूपही काढून टाकण्यात आलेले आहे. या ठिकाणचा दरवाजाही नगर परिषदेच्या दुर्लक्षाने निघून पडला. त्यामुळे हे प्रवेशद्वार मोकळे झाले होते. राणी लक्ष्मीबाई टॉवर हे शहराच्या बाजारपेठेच्या मध्यवर्ती असे ठिकाण आहे. या ठिकाणी न.प.च्या वतीने सूचना देण्यासाठीचा भोंगाही लावण्यात आलेला होता. त्याचबरोबर बाजारपेठ बंद करण्याची दररोजची सूचना या भोंग्याद्वारे दिली जात असायची. गेल्या अनेक वर्षात या ठिकाणचा भोंगा काढून टाकण्यात आला. बाजारपेठ बंद करण्याची दररोज रात्रीची ८.३० वा. भोंगा वाजून दिली जाणारी सूचनाही त्यामुळे बंद झालेली आहे. या ठिकाणी पोलिसांकडून राष्ट्रीय सणाचे ध्वजारोहणही होत असते. मात्र गेल्या काही वर्षात राणी लक्ष्मीबाई टॉवरची दुरावस्था झालेली बघायला मिळते. या टॉवरची उपयोगिता नगरपरिषदेच्या दुर्लक्षाने हळूहळू संपवण्यात आलेली आहे. तसेच टॉवरचे प्रवेशद्वार खुले राहिले तर कोणीही वर चढून जाऊ शकतो हे धडधडीत दिसत असतानाही यापूर्वी कधीही नगर परिषदेने त्याला कुलूप लावण्याची तसदी घेतली नाही. दरम्यान, काल आलेल्या टोकाच्या अनुभवानंतर नगरपरिषद प्रशासनाला उशिरा का होईना शहाणपण सुचले आणि टॉवरवर चढण्याचा मार्ग तात्पुरत्या स्वरूपात पत्रा ठोकून बंद करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news