Parali Vaijnath : परळी वैजनाथ रेल्वे स्थानकावरील लिफ्ट बंद पडली; दहा ते बारा प्रवासी पाऊणतास अडकले !

आपत्कालीन यंत्रणेच्या अभावावरून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
Parali Vaijnath : परळी वैजनाथ रेल्वे स्थानकावरील लिफ्ट बंद पडली; दहा ते बारा प्रवासी पाऊणतास अडकले !
Parali Vaijnath : परळी वैजनाथ रेल्वे स्थानकावरील लिफ्ट बंद पडली; दहा ते बारा प्रवासी पाऊणतास अडकले !
Published on: 
Updated on: 

परळी वैजना : परळी वैजनाथ रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवरील लिफ्ट अचानक बंद पडल्याने दहा ते बारा प्रवाशांना तब्बल पाऊण तास लिफ्टमध्ये अडकून राहावे लागल्याची घटना घडली. या प्रवाशांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश होता. लिफ्टमध्ये अंधार झाल्याने प्रवाशांची चांगलीच घालमेल झाली.

प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवरून पादचारी पुलावर जाण्यासाठी काही प्रवासी लिफ्टचा वापर करीत होते. लिफ्ट सुरू झाल्यानंतर ती मध्येच अचानक बंद पडली. त्यामुळे दहा ते बारा प्रवासी लिफ्टमध्ये अडकले. विशेष म्हणजे, लिफ्ट बंद पडताच आतील वीजपुरवठाही खंडित झाला आणि दिवे बंद झाल्याने प्रवाशांना अंधारातच राहावे लागले. या घटनेनंतर बराच वेळ उलटूनही रेल्वे प्रशासनाकडून तातडीने मदत मिळाली नसल्याचा आरोप अडकलेल्या प्रवाशांनी केला. जवळपास पाऊण तास प्रवाशांना लिफ्टमध्येच काढावा लागला. अखेर तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर आणि वीजपुरवठा सुरळीत झाल्यावर सर्व प्रवासी सुखरूप लिफ्टमधून बाहेर आले.

रेल्वे स्थानकांवर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि सामानासह प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी लिफ्टची सुविधा महत्त्वाची असते. मात्र, लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास प्रवाशांची तातडीने सुटका करण्यासाठी स्वतंत्र आपत्कालीन यंत्रणा आणि तत्पर कर्मचारी उपलब्ध असणे आवश्यक आहे. परळीतील या घटनेमुळे अशा आपत्कालीन परिस्थितीत रेल्वे प्रशासनाची सज्जता कितपत आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने लिफ्टची नियमित देखभाल आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सक्षम करण्याची गरज या घटनेतून अधोरेखित झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.