१२ ज्योतिर्लिंगमधील पंचम ज्योतिर्लिंग परळी वैजनाथ, जाणून घ्या त्याचे धार्मिक महत्त्व आणि कथा

Mahashivratri 2025 Parli Vaijnath | परळी वैद्यनाथाशी जोडल्या गेलेल्या काय आहेत अख्यायिका?
Mahashivratri 2025, Parli Vaijnath, twelve Jyotirlinga temples
बारा ज्योतिर्लिंगापैकी परळी वैजनाथ हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे. (Pudhari Photo)
Published on
Updated on
रविंद्र जोशी

सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम् ।

उज्जयिन्यां महाकालम्ॐकारममलेश्वरम् ॥१॥

परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमाशंकरम् ।

सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावने ॥२॥

वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमीतटे ।

हिमालये तु केदारम् घृष्णेश्च च शिवालये ॥३॥

एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः ।

सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति ॥४॥

Mahashivratri 2025 | आद्य शंकराचार्यांनी रचना केलेले हे द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र आहे. या स्तोत्रात स्पष्टपणे 'परल्यां वैद्यनाथंच' असा परळी वैजनाथ (Parli Vaijnath) ज्योतिर्लिंगाचा उल्लेख केलेला आहे. त्याचबरोबर स्वतः आद्य शंकराचार्यांनी बारा ज्योतिर्लिंग यात्रा केली होती. या यात्रेदरम्यानही ज्योतिर्लिंग म्हणून आद्य शंकराचार्य हे परळी वैजनाथ येथे दर्शन घेऊन, भेट देऊन गेल्याच्या ऐतिहासिक नोंदी आहेत. आद्य शंकराचार्य परळी वैजनाथ येथे ज्योतिर्लिंग दर्शनासाठी आल्याची नोंद श्रृंगेरी येथील शंकराचार्य मूळ पिठामध्ये आजही उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे वेद, उपनिषदे, विविध पुराणे, विविध संत -महंत यांनी केलेली भाष्य ग्रंथे, त्यावर आधारित ग्रंथ व प्रचलित काळातील बहुसंख्य संत- महंत ,धर्म अभ्यासकांच्या मतेही परळी वैजनाथ हेच शास्त्रसंमत ज्योतिर्लिंग स्थान आहे. विविध दंतकथा लोक आख्यायिका लोकसंस्कृती आधीच्या माध्यमातूनही परळीचा उल्लेख ज्योतिर्लिंग वैद्यनाथाची परळी असाच विविध ठिकाणी केला गेला असल्याचे दिसून येते.

परळीच्या प्राचीन नावावरुनही संदर्भ

'वैद्यभ्यम् पूजितम् सत्यम्, लिंगमेटत पुरातम् वैद्यनाथमिति प्रख्यातम् सर्वकामप्रदायकम्”.'

या श्लोकामध्ये वर्णन केलेले सर्व वर्णन हे सांप्रत परळी वैजनाथ व वैद्यनाथ मंदिराला तंतोतंत लागू पडते. परळी वैजनाथ मंदिराभोवती पर्वत, जंगल आणि नद्या, उपयुक्त औषधी वनस्पतींनी परिपूर्ण आहेत. म्हणूनच प्राचीन काळी परळीचे एक नाव वैजयंती असे आहे. परळी ज्योतिर्लिंगाला वैद्यनाथ असेही म्हणतात. येथेच भगवान विष्णूंनी देवांना अमृत प्राप्त करण्यास यशस्वीपणे मदत केली. त्यामुळे या ठिकाणाला 'वैजयंती' असेही म्हणतात.

Mahashivratri 2025, Parli Vaijnath, twelve Jyotirlinga temples
श्री वैजनाथ ज्योतिर्लिंग देवस्थान.(Pudhari Photo)

स्पर्श दर्शन पार्वतीसह निवास आणि धार्मिक महत्त्व

बारा ज्योतिर्लिंगापैकी परळी वैजनाथ हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे. या ज्योतिर्लिंगाचे स्पर्श दर्शन अतिशय महत्त्वाचे समजले जाते. या ज्योतिर्लिंगात अमृत असल्यामुळे ही आरोग्य प्रदान करणारी देवता आहे. अमृत व धन्वंतरी दोन्हींचाही वास या शिवलिंगात असल्याने या ज्योतिर्लिंगास वैद्यनाथ नाव प्राप्त झाले आहे. त्यामुळेच परंपरेप्रमाणे या ठिकाणी स्पर्श दर्शनाची रीत आहे. स्पर्श दर्शनाने सर्व बाधा दूर होतात अशी भाविकांची नितांत श्रद्धा आहे.

पुराणांनुसार परळी वैद्यनाथांचा उल्लेख आहे, त्या आधारावर बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ गावात परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी ५ व्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग आहे. या ज्योतिर्लिंग मंदिराचा स्वत: इंदौरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी जिर्णोद्धार केलेला आहे. हे ज्योतिर्लिंग एका टेकडीवर आहे, ज्यावर चढण्यासाठी पायर्‍याही बनविल्या आहेत. या टेकडीखाली एक छोटी नदीही वाहते आणि जवळच शिवकुंडेही बांधलेली आहेत. परळी वैद्यनाथ वास्तविक ज्योतिर्लिंग आहे. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे, असे म्हणतात. पुण्यश्लोक राणी आहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला.

Mahashivratri 2025, Parli Vaijnath, twelve Jyotirlinga temples
परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी ५ व्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग आहे.(Pudhari Photo)

परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाची कथा

राक्षसांनी केलेल्या अमृत मंथनातून हलाहल (विष), कामधेनु गाय, उच्चै:श्रवा घोड़ा, ऐरावत हत्ती, कौस्तुभ मणि, कल्पवृक्ष, रंभा नामक अप्सरा, देवी लक्ष्मी, वारूणी अर्थात मदिरा, चन्द्रमा, पारिजात वृक्ष, पांचजन्य शंख, धन्वंतरी आणि अमृत अशी चौदा रत्ने बाहेर पडली होती. धन्वंतरी आणि अमृत ही त्यापैकीच दोन रत्ने होती. जेव्हा राक्षस अमृत घेण्यासाठी धावले, तेव्हा श्री विष्णूने धन्वंतरीसह अमृत शिवलिंगात लपवले. राक्षसांनी जेव्हा त्या शिवलिंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या शिवलिंगातून ज्वाला बाहेर पडू लागल्या. पण, जेव्हा शिवभक्तांनी त्याला स्पर्श केला, तेव्हा त्यातून अमृताचा प्रवाह बाहेर येऊ लागला. मान्यता आहे की, परळी वैद्यनाथ हे तेच शिवलिंग आहे. अमृतयुक्त असल्याकारणानेच या ज्योतिर्लिंगाला वैद्यनाथ (आरोग्याचा देव) असे म्हणतात.

मार्कंडेय कथा

मार्कंडेयाला परळी येथे वैद्यनाथाकडून जीवनाचे वरदान मिळाले. ही कथा शिवपुराणातील आहे, मार्कंडेयाला दीर्घायुष्य लाभले नाही. यमाला मार्कंडेयाच्या आयुष्याच्या काळाला अनुसरून त्याचा प्राण घ्यायचा होता. पण शिवाने त्याला मृत्यूपासून आणि यमापासून मुक्त केले. त्याच्या नावावरून परळी वैजनाथ येथील एका तीर्थाला मार्कंडेय तीर्थ नाव देण्यात आले आहे.

वैद्यनाथाशी जोडल्या गेलेल्या काय आहेत अख्यायिका?

या मंदिराशी अनेक आख्यायिका जोडलेल्या आहेत. अशीच एक सत्यवान आणि सावित्रीची कथा आहे. जी परळी येथे घडली असे म्हणतात. शिवलिंगासोबत लंकेला जात असताना रावण येथे थांबल्याची आख्यायिकाही रामायणात आहे.

परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाची कहाणी

वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाची कथा पुराणांवर आधारित आहे. असे म्हणतात की लंकापती रावण, ज्याचे नाव दशाननदेखील होते, ते भगवान शिवांचे भक्त होते. त्यांनी बरीच वर्षे भगवान शिव यांची तपश्चर्या केली. परंतु भगवान शिव प्रकट न झाल्यामुळे तो आपलं एक-एक शिश कापून अग्नीच्या खड्ड्यात टाकू लागला. असे करता-करता त्याने आपले स्वत: चे 9 डोके कापून घेतले. जेव्हा त्याने दहावं डोकं कापण्यास सुरवात केली, तेव्हा भगवान शिव स्वत: हजर झाले आणि त्याला वर मागण्यास सांगितले. त्यांनी भगवान शिवाला म्हटले की आपण शिवलिंग रुपात माझ्यासह लंकेत राहायला चलावे. भगवान शिवाने हे मान्य केले आणि अशीही अट ठेवली की जर तू या शिवलिंगला जमिनीवर कोठे ठेवले तर मग मी तिथे कायमच स्थापित होईन आणि तेव्हा तिथे रावण त्याच्या स्थितीशी सहमत झाला आणि तो त्या शिवलिंगासह लंकेच्या दिशेने निघाला. पण त्याचवेळी रावणाला लघुशंका निवारण करण्याची गरज भासली आणि अशात त्याने एका मेंढपाळाला जबरदस्तीने शिवलिंग धरण्यास सांगितले. त्याच्या हातात शिवलिंग देऊन रावण मूत्र विसर्जन करण्यासाठी गेला. परंतु त्या शिवलिंगाचे वजन त्या मेंढपाळाला सहन झाले नसल्यामुळे त्याने ते तेथेच सोडून दिले आणि निघून गेला. असे म्हटले जाते की तो मेंढपाळ भगवान विष्णू स्वत: होते. कंटाळल्यानंतर शेवटी दशानन रावण तिथून परत लंकेत गेला आणि त्यानंतर नारद मुनी व काही ऋषी भगवान शंकराचे वास्तविक रूप पाहण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी शिवलिंगाचे नाव वैद्यनाथ ज्योतिर्लिंग असे ठेवले. म्हणूनच याला वैद्यनाथ ज्योतिर्लिंग असे म्हणतात. याची स्मृती म्हणून या ठिकाणी ब्रह्मशी नारादंसह अन्य ऋषींची ही प्राचीन मूर्ती असलेली मंदिरे दिसून येतात.

टेकडीवर दगडांचा वापर करून मंदिर बांधले आहे. पूर्वेकडे तोंड करून मंदिराला दक्षिण आणि उत्तर दिशांना दोन दरवाजे आहेत. मंदिराच्या परिसरात एक मोठा सागवान लाकडाचा हॉल आणि प्रदक्षिणा करण्यासाठी प्रशस्त प्रदक्षिणा आवार आहे. मंदिराचे सौंदर्य आणखी वाढवणारे दोन तीर्थ आहेत. त्यांनाही धार्मिक महत्त्व आहे. वैद्यनाथ येथील लिंगमूर्ती शालिग्राम दगडापासून बनलेली आहे. ते सुंदर आणि अतिशय गुळगुळीत आणि परोपकारी वृत्तीचे आहे. मंदिराच्या चारही बाजूंनी नंददीप तेवत असतात.

वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या मंदिराची वास्तू रचना

हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरुपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायर्‍या आणि भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा आणि सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे वैद्यनाथ इथल्या देवाला स्पर्श करुन दर्शन घेता येते.मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत.

२ हजार वर्ष जुना इतिहास असलेले मंदिर

अशी मान्यता आहे की, परळी वैद्यनाथ मंदिर सुमारे २००० वर्षे जुने आहे. या मंदिराचे संपूर्ण बांधकाम करण्यासाठी तब्बल १८ वर्षे लागली आहेत असे सांगितले जाते. परळीपासून जवळ असलेल्या त्रिशूला देवी पर्वत रांगेतून काही खास दगड मिळवले. या दगडातूनच जिर्णोद्धाराचे काम पूर्ण करण्यात आले होते. त्यानंतर स्वर्गीय नानासाहेब देशपांडे यांनी मंदिराचा अप्रतिम सागवानी लाकडी दरबार मंडप बांधला. गावागावातून आणि भाविकांच्या मदतीने कारागीर आणण्यात आले होते त्यांच्या स्मरणार्थ वैद्यनाथ मंदिराजवळ राज राजेश्वर महादेव मंदिरही बांधलेले आहे. वैद्यनाथ मंदिराच्या आवारातच आणखी अकरा ज्योतिर्लिंग मंदिरेही आहेत.

Mahashivratri 2025, Parli Vaijnath, twelve Jyotirlinga temples
छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन संगमेश्वरातील कसबा गाव पाहिले का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news