

परळी वैजनाथ : वाल्मीक कराडच्या समर्थनार्थ काल मंगळवारपासून सुरू झालेल्या आंदोलनाचा सिलसिला आज बुधवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिला. परळीची बाजारपेठ सलग दुसऱ्या दिवशीही बंदच ठेवण्यात आली. परळी तालुक्यातील मोठी गावे व मोठ्या बाजारपेठ असलेल्या धर्मापुरी आणि सिरसाळा येथेही बंद पाळण्यात आला. त्याचबरोबर ठिकठिकाणी वाल्मीक कराड समर्थकांच्या वतीने रास्तारोकोसह विविध आंदोलने करण्यात आली.
वाल्मीक कराडवर मकोका लावण्यात आल्यानंतर मंगळवारी तीन वाजता काही कार्यकर्त्यांनी शहरात फिरून बंदचे आवाहन केले होते. त्यानुसार परळीची बाजारपेठ दुपारपासून बंद होती. आज बुधवारी दुसऱ्या दिवशीही सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडलेली नव्हती. शहरातील आडत बाजारपेठ, किराणा लाईन, मेन रोड, राणी लक्ष्मीबाई टॉवर, नेहरू चौक, स्टेशन रोड व अन्य ठिकाणची दुकाने बंद असल्याचे दिसून आली. काही ठिकाणी औषध दुकाने सुरू होती. शहरातील हॉटेल्स ही बंद आहेत. धर्मापुरी व शिरसाळा येथील बाजारपेठही सकाळपासूनच बंद आहे. या ठिकाणी वाल्मीक कराड समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी केली.