Parli lightning strike: परळीत १३२ केव्ही सबस्टेशनवर वीज कोसळली; अनेक तास अंधार

थर्मलजवळील १३२ केव्ही सबस्टेशनवर शुक्रवारी सायंकाळी आकाशीय वीज कोसळल्याने मोठा तांत्रिक बिघाड झाला.
Lightning
Lightning File Photo
Published on
Updated on

Parli lightning strike

परळी वैजनाथ : परळी शहर व परिसरात तासन्‌तास वीजपुरवठा खंडित होण्यामागचे नेमके कारण समोर आले आहे. थर्मलजवळील १३२ केव्ही सबस्टेशनवर शुक्रवारी सायंकाळी आकाशीय वीज कोसळल्याने मोठा तांत्रिक बिघाड झाला. १३२ केव्ही यंत्रणेतील चार महत्त्वाचे रिले जळून निकामी झाल्याने वीज वितरण व्यवस्था विस्कळीत झाली होती.

१३२ केव्ही सबस्टेशनमधील रिले हे ब्रेकर कंट्रोलर म्हणून कार्य करतात. आकाशीय विजेच्या तीव्र झटक्यामुळे हे चारही रिले जळून निकामी झाल्याने संबंधित फीडरमधील वीजपुरवठा तातडीने बंद पडला. परिणामी थर्मल १३२ केव्ही सबस्टेशनवरून वीजपुरवठा होणाऱ्या अनेक भागांतील वीज वितरण व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली.

घटनेची माहिती मिळताच महावितरणचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे हाती घेतली. सुमारे चार ते पाच तास अखंड परिश्रम घेऊन जळालेल्या रिलेमुळे निर्माण झालेला तांत्रिक बिघाड दूर करण्यात आला. तसेच पांगरी व दाउतपूर येथील १३२ केव्ही सबस्टेशनमधील तांत्रिक दुरुस्तीची कामेही तातडीने पूर्ण करण्यात आली.

या फीडरवरील बहुतांश भागांतील वीजपुरवठा रात्री सुमारे १० वाजेपर्यंत पूर्ववत करण्यात आला. मात्र, थर्मल १३२ केव्ही सबस्टेशन तसेच काळरात्री मंदिर परिसरातील वीज यंत्रणेतही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने काही भागांतील वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी अधिक वेळ लागला. रात्रभर महावितरणचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी तळ ठोकून दुरुस्तीचे काम करत होते.

हा तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी उपकार्यकारी अभियंता ए. बी. खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष कांदे, उत्तम फड, मुस्ताक, वैभव मुंडे, पी. एम. मुंडे, विकी मुंडे तसेच इतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या प्रयत्नांमुळे प्रभावित झालेला वीजपुरवठा रात्रीपर्यंत पूर्ववत करण्यात यश आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news