

नेकनूर : मनोज गव्हाणे
आठवडाभरापासून मुसळधार असलेल्या अवकाळीने नेकनूर परिसरातील कांदा उत्पादक गावांना मोठा फटका बसला आहे. काढणीला आलेल्या शेकडो हेक्टरवरील कांद्याचे पीक नासू लागले असून, कष्टांबरोबरच केलेला खर्चही पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत.
नेकनूरसह परिसरातील अनेक गावे कांदा उत्पादक म्हणून ओळखली जातात. बारा महिने कांद्याचे पीक घेणारे काही शेतकरी या भागात असून, उन्हाळी कांदा टिकाऊ असल्याने त्याच्या उत्पादनाकडे मोठ्या प्रमाणात परिसरातील शेतकरी वळले होते. मात्र, यावर्षी मे महिन्यात अवकाळीने मोठा मुक्काम ठोकल्याने काढणीला आलेल्या शेकडो हेक्टर क्षेत्रातील कांदे नासून खराब झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, मेहनतींसोबत केलेला खर्चही पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत. शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
नेकनूरसह परिसरात आठवड्यापासून मुक्कामी असलेल्या अवकाळी पावसामुळे कांदा पिकासह आंबा, पपई यांनाही फटका बसला आहे. सरकारने केवळ आश्वासन न देता नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत देण्याची गरज आहे.
मागील आठ दिवसांपासून सलग पाऊस सुरू आहे. त्यामुळे माझ्या शेतात काढणीला आलेल्या दोन एकर कांद्याची नासाडी झाली असून, अशीच परिस्थिती अनेक शेतकऱ्यांची आहे. यामुळे मोठे नुकसान झाले. उत्पन्न तर सोडा, खर्चही वाया गेला आहे.
- प्रल्हाद शिंदे, शेतकरी, नेकनूर