आता शस्त्रक्रियेसाठी रुग्णांपर्यंत पोहोचणार डॉक्टर
बीड, पुढारी वृत्तसेवाः स्थानिक आरोग्य केंद्रामध्ये तपासणीसाठी येणाऱ्या रूग्णांची तपासणी केल्यानंतर निदान होवुन शस्त्रक्रिया आवश्यक असल्यास अशा रूग्णांना जिल्हास्तरावर व इतरत्र रूग्णालयामध्ये रेफर करण्यात येते. यामुळे रूग्णांची आणि रूग्णांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय होते. रेफर करण्यासाठी पेशंटचा प्रवास आणि जाणारा वेळ यामुळे अनेक अडचणी येवु शकतात ही बाब लक्षात घेवुन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी आता संबंधीत रूग्णांना जिल्हा स्तरावर किंवा इतरत्र रेफर न करता जवळच्याच ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय या ठिकाणी शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे रूग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सर्व उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय, स्त्री रूग्णालय, वृध्दत्व व मानसीक रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांना याबाबत पत्र पाठवुन संबंधीत आरोग्य संस्थेत मेजर कॅम्प व लॅप टी. एल शिबीर घेण्याबाबतचे नियोजन करून दिले आहे. त्या अनुशंगाने महिन्यातील प्रत्येक मंगळवार व शुक्रवार संबंधीत आरोग्य संस्थेत तपासणी करून शस्त्रक्रियेसाठी तयार असलेल्या रूग्णांना संबंधीत दिवशी आरोग्य संस्थेत येण्याबाबत सुचीत करावे. आणि आपल्या आरोग्य संस्थेत शस्त्रक्रिया होत आहेत. हे येणार्या रूग्णांना माहित व्हावे याबाबतचे वेळापत्रक दर्शनी भागावर सुचना स्वरूपात लावावे अशा सुचना दिल्या आहेत.
शस्त्रक्रिया शिबिराचे असे असेल नियोजन (मेजर कॅम्प)
मंगळवार पहिला व तिसरा गेवराई उपजिल्हा रूग्णालय आणि ग्रामीण रूग्णालय माजलगाव, मंगळवार - दुसरा व चौथा केज उपजिल्हा रूग्णालय आणि ग्रामीण रूग्णालय धारूर, शुक्रवार - पहिला व तिसरा पाटोदा ग्रामीण रूग्णालय, आष्टी ग्रामीण रूग्णालय, शुक्रवार - दुसरा व चौथा - लोखंडी सावरगाव रूग्णालय, परळी उपजिल्हा व नेकनुर स्त्री रूग्णालय
शस्त्रक्रिया शिबिराचे असे असेल नियोजन (लॅप टी.एल. कॅम्प)
मंगळवार - पहिला व तिसरा तालखेड ग्रामीण रूग्णालय आणि तेलगाव रूग्णालय, मंगळवार - दुसरा व चौथा नांदुरघाट ग्रामीण रूग्णालय, चिंचवण रूग्णालय, शुक्रवार - पहिला व तिसरा - रायमोहा ग्रामीण रूग्णालय, शुक्रवार दुसरा व चौथा - धानोरा - बु. ग्रामीण रूग्णालय.