

बीड : शशी केवडकर
जीवनात क्षण एक असतो पण वळण देतो इतिहासाला! सौंदर्याच्या जगात यशस्वी होऊनही अंतर्मनात असलेल्या सामाजिक भानाने प्रेरित होऊन प्रशासकीय सेवेत झेप घेणार्या नितीका विलाश यांची कहाणी ही फक्त यशाची नव्हे, तर संवेदनशीलतेची, आत्मप्रेरणेची आणि ध्येयवेडेपणाची आहे. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली ती फॅशन डिझायनिंगमधून. गोल्ड मेडल मिळवत त्यांनी या क्षेत्रात पदवी संपादन केली होती.
परदेशात शिष्यवृत्तीवर उच्च शिक्षणासाठी जाण्याची संधी देखील पदरात पडली होती. पण नियतीने काही वेगळंच लिहून ठेवले होते .. एक हिंदी चित्रपट - ‘पिपली लाईव्ह’ - त्यांच्या जीवनाचा टर्निंग पॉइंट ठरला. ग्रामीण जीवनातील हतबलतेचं, शेतकर्यांच्या व्यथांचं वास्तव पाहून त्यांच्या मनात भावनांचा काहूर उसळला. हे दृश्य त्यांच्या अंतःकरणाला हेलावून गेलं. वडिलांनी सांगितलेला एक विचार त्यांच्या मनात खोलवर रुजला - दु:ख पाहून बसू नको, त्यावर उपाय शोध. आणि मग सुरू झाला एक वेगळ्या प्रवासाचा प्रारंभ - प्रशासकीय सेवेत जाण्याचा! फॅशन डिझायनिंग सारख्या कलात्मक क्षेत्रातून थेट लोकसेवा आयोगाच्या परीक्षेकडे वळण ही काही सोपी गोष्ट नव्हती. दिल्लीतील क्लासेसमध्ये त्यांच्या पार्श्वभूमीची खिल्ली उडवली गेली. तुम्ही इथे टाइमपास करायला आलात का? असे प्रश्न विचारले गेले. पण या उपेक्षेनेच त्यांनी मनोबल अधिक खंबीर केलं.
मी या पदावर समाधानी आहे, कारण मी स्वतःशी कधीही समझोता केला नाही.
नितीका विलाश , उपयुक्त आयकर विभाग (अन्वेषण विभाग )
जेष्ठ प्राध्यापक मनोज झा यांनी मार्गदर्शन केल , आत्मविश्वास दिला. आणि मग सुरू झाला स्व-अभ्यासाचा प्रदीर्घ प्रवास. पहिल्याच प्रयत्नात अपयश आले, पण म्हणतात ना - अपयश हेच यशाचं पहिल पाऊल असतं! दुसर्या प्रयत्नात त्यांनी आयआरएस (भारतीय महसूल सेवा) ही सर्वोच्च प्रशासकीय सेवा मिळवली.आई-वडिलांचा अभिमान, समाजाची स्तुती आणि स्वतःच्या मेहनतीचं फळ यांचं हे सुंदर मिश्रण होतंमसुरी येथे प्रशिक्षण घेत असताना नवनीत कान्वत या आयआरएस अधिकार्याशी ओळख झाली. मैत्रीचा हा प्रवास पुढे प्रेमात आणि विवाहात बदलला. नवनीत हे सध्या बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असून दोघांचं आयुष्य म्हणजे कार्यक्षमता आणि कुटुंबस्नेहाचा सुंदर समतोल.त्यांना नाव्या आणि नैना या दोन कन्या असून, त्यांचे संगोपन हे दोघेही अत्यंत जबाबदारीने पार पाडतात. समजुतीचा सैलसर धागा धरला की कुटुंब अटूट राहतात, या उक्ती प्रमाणे हे दाम्पत्य आपले सहजीवन आज आनंदात जगात आहेत.
आजच्या समाजात ज्या पद्धतीने महिलांवर अत्याचार, हुंड्याची मागणी, मानसिक छळ होत आहेत, त्याबाबत बोलताना त्यांनी ठाम भूमिका घेतली. मुलगी ही भार नाही, ती आधार आहे. तिच्या शिक्षणात गुंतवणूक करा, तिच्या लग्नात नव्हे!त्यांच्या मते, जेव्हा पालक मुलीच्या सशक्ततेवर लक्ष केंद्रित करतात, तेव्हाच समाज बदलतो. हुंड्यासारख्या प्रथांवर त्यांनी खरमरीत शब्दांत टीका केली - हुंड्यासाठी जगण्याचा सौदा करणारा समाज, प्रगतीची नाही तर अधोगतीची वाट धरतो.
आज त्या फॅशन डिझायनर नसली, तरी ती समाजाच्या समस्यांना ‘डिझाईन’ करणारी अधिकारी आहे. त्यांच्या प्रवासातून एक गोष्ट नक्कीच शिकण्यासारखी आहे - ध्येयावर निष्ठा असेल, तर कुठलाही मार्ग अपूर्ण राहत नाही.
शेवटी एवढंच म्हणावं लागेल...ज्यांचं मन प्रामाणिक असतं, त्यांची वाट नियती स्वतः शोधते! अशा स्त्रीला ना अडथळे थांबवू शकतात, ना समाजाचे प्रश्न - ती झेपावते, ती घडते आणि तीच इतिहास घडवते!
करचोरी, बेकायदेशीर संपत्तीची साखळी, काळा पैसा - हे सर्व प्रकार उघडकीस आणणं म्हणजे तलवारीधारावर चालणं. पण नितीका यांनी दहावर्षांच्या सेवेत धाडस आणि ध्येयवाद दाखवला आहे. एका उद्योगपतीकडे पुरावे मिळवण्यासाठी त्यांनी आपल्या सहकार्यांसह वर्हाडी बनून लग्नात प्रवेश केला ही किस्सासुद्धा त्यांच्या कार्यशैलीचा बिनधास्त नमुना आहे.