

अंबाजोगाई: महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धगधगते पर्व आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच अवघ्या बीड जिल्ह्यासह मुंदडा कुटुंबावर शोककळा पसरली आहे. राजकीय भूमिकांच्या पलीकडे जाऊन जपलेले कौटुंबिक नाते आज काळाने कायमचे हिरावून नेले आहे.
अजित पवार आणि मुंदडा कुटुंबाचे संबंध हे केवळ राजकीय नव्हते, तर ते भावनिक आणि कौटुंबिक होते. अजित पवारांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि केज मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांना आपले अश्रू अनावर झाले. आपल्या मार्गदर्शकाला आणि पितृतुल्य व्यक्तिमत्वाला गमावल्याच्या भावनेने नमिता मुंदडा यांनी साश्रूनयनांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
अजित पवार आणि दिवंगत नेत्या माजी मंत्री विमलताई मुंदडा यांच्यातील नाते महाराष्ट्राने अनेक वर्षे जवळून पाहिले आहे. विमलताईंना अजित पवारांनी नेहमीच आपली बहीण मानले होते. राजकीय पटलावर अनेक चढ-उतार आले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल झाले, तरीही या बहीण-भावाच्या नात्यात कधीही अंतर पडले नाही. विमलताईंच्या निधनानंतर मुंदडा कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राजकीय दुरावा निर्माण झाला असला, तरी अजित पवारांनी हे कौटुंबिक संबंध कधीही तुटू दिले नाहीत. त्यांनी मुंदडा कुटुंबाला नेहमीच हक्काचा आधार दिला. युवा नेते अक्षय मुंदडा यांना त्यांनी नेहमीच भाच्याप्रमाणे वागणूक दिली आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.
मुंदडा कुटुंबात सून म्हणून आलेल्या नमिता मुंदडा यांच्यासाठी अजित पवार हे केवळ एक ज्येष्ठ नेते नव्हते, तर ते एक उत्तम मार्गदर्शक होते. केज विधानसभा मतदारसंघाच्या विकासकामात त्यांनी नेहमीच सक्रिय सहकार्य केले. नमिता मुंदडा यांना ते कुटुंबातील मुलीप्रमाणेच सजतत. प्रशासकीय कामकाज कसे करावे, फाईल्सचा पाठपुरावा कसा करावा आणि जनतेचे प्रश्न ताकदीने कसे मांडावेत, याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन केले. आज या मार्गदर्शकाचे छत्र हरपल्याची भावना नमिता मुंदडा यांची आहे. आहे. "कर्तव्याशी निष्ठा, शब्दाला वजन आणि निर्णयात ठामपणा असलेलं नेतृत्व आज आपल्यातून निघून गेलं आहे. दादा, तुमची अनुपस्थिती प्रत्येक टप्प्यावर जाणवेल. ही हानी अपूरणीय असून तिची भरपाई कधीच होऊ शकणार नाही. सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी सदैव उभं राहिलेलं नेतृत्व म्हणून तुमचं कार्य कायम स्मरणात राहील. आपल्या आयुष्यभराच्या सेवेला विनम्र नमन" अशा शब्दांत त्यांनी आपला शोक व्यक्त केला.
अजित पवार यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करताना केवळ पदाचा वापर केला नाही, तर जिल्ह्याच्या प्रत्येक प्रश्नात मनापासून लक्ष घातले. दुष्काळ असो वा विकासकामांचा निधी, अजित पवारांनी बीड जिल्ह्यासाठी नेहमीच झुकते माप दिले. जिल्ह्याच्या राजकारणात त्यांनी अनेक नेते घडवले आणि कार्यकर्त्यांना ताकद दिली. जिल्ह्याच्या विकासाची दृष्टी असलेला आणि प्रशासनावर वचक असलेला एक लोकनेता आज काळाच्या पडद्याआड गेल्याने बीड जिल्ह्याचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. दादा आपल्यात नाहीत, या सत्याचा स्वीकार करणे सध्या सर्वांसाठीच कठीण झाले आहे अशा भावना आ. मुंदडा यांनी व्यक्त केल्या.