

Murder of a Sleeping Father
कडा, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील कडा बसस्थानक परिसरात सोमवारी पहाटे अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. दारुच्या नशेत असलेल्या मुलाने स्वतःच्या वडिलांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा निर्दयीपणे खून केल्याची घटना समोर आली असून, परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेत अनिल सजन मुळे (वय ५०) यांचा जागीच मृत्यू झाला असून, किरण मुळे (वय १९) हा आरोपी मुलगा सध्या फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळे कुटुंब हे मूळचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पिसादेवी येथील रहिवासी असून, गेल्या काही वर्षांपासून कडा बसस्थानक परिसरात झोपडीत वास्तव्यास होते.
सोमवारी पहाटेच्या सुमारास किरण मुळे हा दारुच्या नशेत घरी परतला. त्यावेळी वडील अनिल मुळे हे गाढ झोपेत असताना, संतापाच्या भरात त्याने त्यांच्या डोक्यात मोठा दगड घालून प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात अनिल मुळे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनेनंतर आरोपी किरण मुळे हा फरार झाला असून, पोलिसांकडून त्याचा कसून शोध सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक शरद भुतेकर, सहायक पोलिस निरीक्षक विजय नरवाडे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी दोन विशेष पथके तैनात केली असून, परिसरात शोधमोहीम सुरू आहे. या घटनेमुळे कडा शहरात मोठी खळबळ उडाली आहे.