

केज : गौतम बचुटे
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला दोन महिने उलटले तरी देखील या प्रकरणातील संशयित आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्याय मिळावा म्हणून मस्साजोगचे ग्रामस्थ पुन्हा एकदा एकवटले आहेत. २५ फेब्रुवारी रोजी मस्साजोग ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप आ. सुरेश धस यांनी दि. २२ फेब्रुवारी रोजी मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी देशमुख कुटुंबियांसह ग्रामस्थांशी चर्चा केली. या नंतर माध्यमांशी संवाद साधताना सुरेश धस यांनी संतोष देशमुख प्रकरणावर सविस्तर भाष्य केले आहे.
सुरेश धस म्हणाले की, मस्साजोग ग्रामस्थांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे. या प्रकरणातील पोलीस निरीक्षक महाजन आणि पोलीस उपनिरीक्षक पाटील या अधिकाऱ्यांना बडतर्फ केलं पाहिजे; ही मागणी आहे. सायबर सेलमधील दोन तज्ञांची ए टी एस मध्ये नियुक्ती व्हावी. आरोपींचे फोन कॉल कुणाला झाले आहेत? हे तपासले पाहिजे. मागील दोन महिन्या पूर्वीचे सी डी आर तपासले पाहिजेत. पोलीस अधिकारी महाजन यांची बीड येथे नियुक्ती आहे. त्यांचे कामकाज केज पोलीस ठाण्यात कसे काय चालते? या दोन्ही पोलिस अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.
कृष्णा आंधळे फार शातिर आहे. आरोपींचे मनोबल वाढविण्यासाठी गुन्हेगारांचे समर्थक न्यायालयात येतात. कृष्णा आंधळे अटक होणे गरजेचे आहे. रमेश घुले, दत्ता बिक्कड, दिलीप गित्ते, गोरख फड यांचे सी डी आर तपासून त्यांना सहआरोपी करा. शासकीय वकील म्हणून ॲड. उज्ज्वल निकम यांची यात नियुक्ती केली पाहिजे. या मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात नक्की चालवले जाणार आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे चार्जशीट दाखल करण्यापूर्वी ग्रामस्थांनी ८ मागण्या मांडल्या आहेत. पोलिसांची देखील चौकशी करा. नितीन बिक्कड याने धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी बैठक केली. तो आरोपी कसा होत नाही ? आरोपींना फरार करण्यात त्याचा वाटा आहे. सोमवार पर्यंत मागण्यांवर पूर्ण चर्चा आणि कारवाई झाली तर ग्रामस्थांचा विश्वास वाढेल. या मागण्या मुख्यमंत्र्यांच्या मी कानावर घालणार आहे. जेल प्रशासना संदर्भात देखील ग्रामस्थांनी मागण्या केल्या आहेत. जे मदत करत आहेत ते जेल प्रशासनातील लोक निलंबित झाले पाहिजेत. पोलीस अधीक्षक बदलले असले तरी खालची यंत्रणा तीच आहे. अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे.
आ. सुरेश धस पुढे म्हणाले की, पोलीस दल आतापर्यंत आका आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून चालत होते. महादेव मुंडे प्रकरणाला १६ महिने झाले आहेत. महादेव मुंडे प्रकरणातील आरोपीने त्यांच्या कुटुंबाला धमकी दिली. हे किती खतरनाक लोक आहेत. पोलीस अधिकारी महाजन या ठिकाणी राहिलाच कसा? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. हा अतिशय गंभीर प्रकारचा गुन्हा आहे. ग्रामस्थांना उपोषण मागे घेण्यासाठी विनंती करणार नाही. त्या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे रविवारी नागपूरला जाणार आहे. त्यावेळी त्यांच्याकडे या संदर्भात चर्चा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आयपीएस पोलीस अधिकारी पंकज कुमावत यांना अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती द्यावी. कृष्णा आंधळेचे घरदार पोलिसांनी का आणले नाही? आमचा संतोष देशमुख सारखा सुंदर माणूस तुम्ही हिरावून घेतला. हा चटका मनाला लागला आहे. ते उद्याच मुख्यमंत्र्यांची मी भेट घेणार आहे. ग्रामस्थ त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. मुख्यमंत्र्यांनी जर त्यांच्या मागण्यावर सकारात्मकता दाखवली; तर उपोषणाला बसू नका. आत्मक्लेष म्हणजे साधी गोष्ट नाही. अशी विनंती आहे. ते आता यापुढे कारवाई करूनच येणार अन्यथा येणार नाही. असेही आ. सुरेश धस यांनी म्हटले.
जेलमध्ये आरोपींना व्हीआयपी ट्रिटमेंट मिळते. त्याचे सीसीटीव्ही फुटेजसह पुरावे आहेत. वाल्मिक कराडला चहा कोण आणून देत आहे ? जेवण कोण आणून देत आहे ? काही लोकांना मटण कसे पोहोचते ? अशा प्रकारचे पुरावे आहेत. आरोपींना मोठी बॅग कोण नेऊन देत आहे ? जे कर्मचारी यात जबाबदार असतील; त्यांना निलंबित करावे. ही ग्रामस्थांची मागणी असल्याचे सुरेश धस यांनी सांगितले.