

कडा : आष्टी तालुक्यातील कडा येथे आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांच्या विरोधात फेसबुक पोस्टद्वारे आक्षेपार्ह व धमकीवजा मजकूर टाकण्यात आल्याची तक्रार समोर आली आहे. “केसालाही धक्का लागला तर खेळ खल्ल्यास..” अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करून धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या संदर्भात कडा भाजपा प्रमुख व माजी सरपंच अनिल ढोबळे यांच्या वतीने संबंधित गोविंद फड नावाच्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. गोविंद फड हा परळीचा रहिवासी असून याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करत आमदार धस समर्थकांनी कडा पोलीस ठाणे गाठून लेखी निवेदन दिले.
या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या पोस्टमुळे आमदार धस यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारांवर तात्काळ कारवाई करून संबंधित व्यक्ती विरोधात गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करावीअशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी रमजान तांबोळी,सरपंच युवराज पाटील,संदीप खाकाळ, संजय ढोबळे,अंकुश चव्हाण,माजी उपसरपंच राजबाप्पू कर्डिले, बाळासाहेब कर्डिले, भाऊसाहेब भोजने,अशोक ढवण,सागर खेडकर, बाळासाहेब खाकाळ यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पोलिसांनी निवेदन स्वीकारून प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.