

Dharur taluka theft incident
धारूर : धारूर तालुक्यातील अरणवाडी येथील शेतकरी सुमंत फुटाणे हे अनुदानाची रक्कम उचलण्यासाठी धारूर येथील एसबीआय बँकेत आले होते. यावेळी दिवसाढवळ्या त्यांनी खात्यातून काढलेल्या ५० हजार रूपयांची चोरीची धक्कादायक घटना आज (दि.२४) घडली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
धारूर तालुक्यातील अरणवाडी येथील शेतकरी सुमंत फुटाणे यांनी आज दुपारी बँकेतून रक्कम काढून काउंटरवर ठेवली. यावेळी चौकशी सुरू असतानाच एका लहान मुलाने नकळतपणे पन्नास हजार रुपयांचे बंडल उचलले व त्वरित पळ काढला. या मुलासोबत आणखी एक साथीदार मुलगाही उपस्थित असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसून आले आहे.
या घटनेनंतर ग्राहकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, दिवसाढवळ्या बँकेच्या परिसरात अशा प्रकारे चोरी घडल्याने सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. बँक व्यवस्थापन व पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे बँक ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बँक सुरक्षेची जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडण्याची मागणी ग्राहकांकडून केली जात आहे.