

केज : पाणी पिण्याचा बहाणा करीत एका १४ वर्षीय मुलीचा घरात घुसून विनयभंग केल्याची घटना केज तालुक्यातील एका गावात घडली. याप्रकरणी तरुणाविरुद्ध पोक्सो आणि ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि.१४) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.
केज तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय मुलगी ही रविवारी (दि.१४) सायंकाळी घरासमोर कपडे धुवीत होती. यावेळी शहादू दशरथ माने (रा.केज) याने येऊन तिला पिण्यास पाणी मागितले. ती घरातून पाणी आणण्यास गेली असता शहादू याने तिच्या पाठीमागे घरात जाऊन तू मला आवडतेस, असे म्हणत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करत तिचा विनयभंग केला. त्यानंतर मुलीची आई या तरूणाला जाब विचारण्यास गेली असता त्याने तिला शिवीगाळ करून मारहाण केली, अशी तक्रार पीडित मुलीने दिल्यावरून शहादू दशरथ माने याच्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात पोक्सो आणि ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना हे करीत आहेत.