Beed Crime : माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ; उचलले टोकाचे पाऊल

पतीसह सासरच्या तिघांविरोधात गुन्हा दाखल
Beed Crime News |
माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ; उचलले टोकाचे पाऊलFile Photo
Published on
Updated on

अंबाजोगाई : घरखर्चासाठी माहेरहून पैसे आणावेत, म्हणून सतत मारहाण व मानसिक छळ केल्याने छळास कंटाळून २० वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ही घटना अंबाजोगाई शहरातील गांधीनगर परिसरात रविवारी (दि.२७) उघडकीस आली. अनम शेख असे या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनमचा भाऊ मुजफ्फर सिकंदर शेख यांच्या फिर्यादीनुसार, अनम शेख हिचा विवाह २०२३ मध्ये गांधीनगर येथील सोहेल अफसर शेख याच्याशी झाला होता. विवाहावेळी मानपान, संसारोपयोगी वस्तू व अंगावर सोन्याचे दागिनेही देण्यात आले होते. तिला पाच महिन्यांचा एक मुलगाही आहे. लग्नानंतर काही महिन्यांतच पती सोहेल शेख याला दारूचे व्यसन लागले. त्यानंतर त्याने व त्याच्या घरच्यांनी अनम हिचे दागिने मोडून घरखर्चासाठी वापरले. दागिने संपल्यावर माहेरून पैसे आणावेत, म्हणून अनमवर सासरच्या मंडळींकडून सतत मानसिक व शारीरिक छळ करण्यात येत होता. तिचे पती सोहेल, दिर मझहर शेख आणि जाऊ तन्नो शेख हे अनमच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ केल्याचे फिर्यादीने नमूद आहे.

अनमच्या आई-वडिलांनी मध्यस्थी करत काही वेळा पतीला पैसेही दिले. मात्र, तरीही अनमचा छळ सुरूच असल्याचे तिच्या भावाने अपल्या फिर्यादीत सांगितले. २६ जुलै रोजी सोहेल शेख याने तिच्या आईकडे ३० हजार रुपये वेल्डिंगच्या दुकानासाठी मागितले होते. मात्र, सासरकडून पैसे न मिळाल्यामुळे तो चिडून होता. २६ जुलैच्या मध्यरात्री अनमच्या सासऱ्यांनी फोन करून सांगितले की, अनमने विषारी औषध घेतले आहे. मात्र, जेव्हा कुटुंबीय रुग्णालयात पोहोचले तेव्हा डॉक्टरांनी तिने गळफास घेऊन जीवन संपविले असल्याचे सांगितले. याप्रकरणी पती सोहेल शेख, दिर मझहर शेख व जाऊ तन्नो शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी सोहेल शेखला ताब्यात घेतले असून पुढील तपास पीएसआय रवीकुमार पवार करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news