

सुभाष मुळे
Marathwada Rain|गेवराई तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे शेतकरी आणि व्यापारी वर्ग दोघांचेही मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे गावोगावी नाले तुडुंब भरून वाहत आहेत, घरात-दुकानात पाणी शिरले आहे, तर शेतं-शिवारं अक्षरशः नाल्याचं रूप आल्याने उद्ध्वस्त झाली आहेत.
तालुक्यातील शेतकऱ्यांवर मात्र आभाळ कोसळले आहे. गेवराई, रुई, धोंडराई, सिंदफना व गोदावरी पट्ट्यासह सर्वत्र कपाशी, सोयाबीन, तूर, मका, बाजरी व ऊस पाण्याखाली गेला आहे. सुपीक पट्ट्यातील मोसंबी बागांचे तर न भरून निघणारे नुकसान झाले आहे. गेल्या पंधरा वर्षांत उभ्या राहिलेल्या बागा काही तासांच्या पावसात वाहून गेल्या. शेतकरी सांगतात की, “पोटच्या मुलापेक्षा या झाडांचे लाड पुरवले; पण आज ही झाडं वाहून गेली. आमच्या लेकरांच्या शिक्षणापासून संसारापर्यंत सगळं या पुराने वाहून नेलं.” रुई येथील शेतकरी बंडू सुगडे यांचे शेत पूर्णपणे पाण्याखाली गेले असून, कपाशी, ऊस, भाजीपाला या सगळ्यांचे होत्याचे नव्हते झाले. केंद्र व राज्य सरकारने तातडीने हेक्टरी एक लाख रुपये सरसकट मदत जाहीर करावी. पंचनाम्याच्या नावाखाली वेळ न घालवता विशेष आर्थिक पॅकेज मिळाले पाहिजे.”, अशी मागणी रामेश्वर गायकवाड यांनी केली आहे.
जगातला सर्वात मोठा कृषीप्रधान देश असूनही बळीराजा देशोधडीला लागलाय सरकार जगाच्या पोशिंद्याचे हालच विचारात घेतले जात नाहीत, असा आरोप महापुरात उद्ध्वस्त झालेल्या शेतकरी करत आहेत. कपाशीची दोडी सडून गेली, सोयाबीन मातीमोल झालं, ऊस आडवा झाला, तरी सरकार बहिरं झालंय की काय?” अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
“आर्थिक मदतीपेक्षा धीर महत्त्वाचा आहे. बळीराजाचा कणा मोडला नाही, तो पुन्हा उभा राहील, फक्त त्याला आधार द्या.” सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर तात्काळ सरसकट ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी, हेक्टरी आर्थिक पॅकेज द्यावे व पिकविमा तत्काळ मंजूर करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.
गेवराई शहरातील तहसील रोडवर असलेल्या इस्लामपुरा येथील जहांगीर व्यापारी संकुलासह अनेक ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसाने दुकानात देखील अक्षरशः नाल्याचं स्वरूप आलं. फोटो स्टुडिओसह अनेक दुकानांमध्ये पाणी घुसून मोठे नुकसान झाले. फोटो स्टुडिओमधील महत्त्वाचे अल्बम, संगणक, पडदे, बिलबुक पाण्यात बुडाले. दुकानदार कृष्णा विठ्ठलराव वादे यांच्यासह व्यापाऱ्यांची धावपळ उडाली, मात्र सर्व माल वाचविणे अशक्य झाले. रस्त्यांची असमान उंची, पावसाळी गटारांची अपुरी स्वच्छता आणि बंद आउटलेट्स यामुळे नागरिक व व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.