

बीड: मराठा आंदोलनातील मनोज जरांगे पाटील यांचे जुने सहकारी अमोल खुणे यांच्यावर बीड तालुक्यातील पाली गावाजवळील नागनाथ मंदिरात तरुणांच्या जमावाने हल्ला केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. “मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात का बोलतोस?” असे म्हणत आपल्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप खुणे यांनी केला आहे. या हल्ल्यात त्यांच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अमोल खुणे रविवारी दुपारी दर्शनासाठी पाली येथील नागनाथ मंदिरात गेले होते. त्याचवेळी तुळजापूरहून ज्योत घेऊन येणारे काही तरुण तेथे पोहोचले. या तरुणांनी मंदिराचे गेट बंद करून आपल्याला लाकडी दांड्याने मारहाण करण्यास सुरुवात केली, असा दावा खुणे यांनी केला आहे. या हल्ल्यात त्यांच्या दोन्ही हातांना गंभीर मार लागल्याचे त्यांनी सांगितले.
जरांगे पाटलांवर थेट आरोप
या घटनेनंतर अमोल खुणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मनोज जरांगे यांनीच माझ्यावर हल्ला करण्यासाठी सुपारी दिली असा आरोप त्यांनी केला आहे. नारायणगडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याला आपण उपस्थित राहणार असल्याचे जाहीर केले होते. आपण या मेळाव्याला येऊ नये, यासाठीच आपल्यावर हल्ला करण्यात आल्याचा दावाही खुणे यांनी केला आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
या घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केला असून, वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी रवाना झाल्याचे सांगण्यात आले. हल्ल्यामागील नेमके कारण काय, हल्ल्यात सहभागी असलेले तरुण कोण? याचा तपास पोलिसांकडून केला जाणार आहे.