

beed news
केज : गौतम बचुटे
गावातील महिलांचा पाठलाग करून आणि सार्वजनिक नळावर पाणी भरणाऱ्या महिलांचे गुपचूप फोटो काढून ते 'एआय' ॲपद्वारे स्वतःच्या फोटोसोबत जोडणाऱ्या व सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करणाऱ्या नराधमाविरुद्ध केज पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केज तालुक्यातील सारणी (सांगवी) येथील कलीम गफूर शेख याने गावातील सार्वजनिक नळावर पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलांचे गुपचूप फोटो काढले. त्यानंतर 'एआय' ॲपचा गैरवापर करून ते फोटो स्वतःच्या फोटोसोबत जोडले. तसेच, गावातील एका ३० वर्षीय महिलेच्या सोशल मीडिया स्टेटसवरील फोटोचा स्क्रीनशॉट काढून तोही स्वतःच्या फोटोसोबत जोडला. याप्रकरणी बदनामी व विनयभंग केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, कलीम गफूर शेख याने तिच्या स्टेटसवरील फोटोचा स्क्रीनशॉट काढून तो एआय ॲपद्वारे स्वतःच्या फोटोला जोडला. तसेच गावातील इतर महिला व मुलींचा गुपचूप पाठलाग करून सार्वजनिक नळावर त्या पाणी भरत असताना त्यांचे फोटो मोबाईलमध्ये काढून ठेवले. या प्रकारामुळे महिलांच्या मान-सन्मानाला धक्का पोहोचून त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या तक्रारीवरून कलीम शेख याच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.