Beed kidnapping news | प्रेयसीसोबत मोठ्या बहिणीच्या अपहरणाचा प्रयत्न; माजलगावकरांनी हाणून पाडला डाव

अपहरणकर्ते व दोघी मुली अंबाजोगाई येथील रहिवाशी आहेत
kidnapping
kidnappingPudhari
Published on
Updated on

माजलगाव : अंबाजोगाई येथील एका तरुणीला पळवून नेण्याचा प्रयत्न करत असताना, तिला वाचवण्यासाठी आलेल्या मोठ्या बहिणीचेही अपहरण करण्याचा प्रकार माजलगाव शहरातील आंबेडकर चौकात घडला. सुदैवाने, वेळीच आरडाओरडा झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी तत्परता दाखवत संबंधित तरुण आणि त्याच्या दोन साथीदारांना पकडून पोलिसांच्या हवाली केले. या थरारामुळे माजलगाव शहरात काही काळ खळबळ उडाली होती.

नेमकी घटना काय?

अंबाजोगाईच्या तुळजाभवानी कॉलनीतील सलोनी (नाव बदलले) आणि येरडा (ता. अंबाजोगाई) येथील दिनेश देवकते यांचे बीड येथील कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना प्रेमसंबंध जुळले होते. घरच्यांच्या विरोधानंतरही दोन महिन्यांपूर्वी त्यांनी विवाह केल्याची माहिती आहे. मात्र, कुटुंबीयांनी समजूत घालून सलोनीला घरी परत आणले होते. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव सलोनीला तिची बहीण भाग्यश्री आणि मावस भाऊ सुरज यांच्यासोबत परळी तालुक्यातील पोहनेर येथे नातेवाईकांकडे ठेवले होते.

सोमवारी (दि. २३) रोजी आजाराच्या कारणास्तव या दोघी बहिणी आणि मावस भाऊ उपचारासाठी माजलगावात आले होते. उपचार आटोपून परतत असताना, सलोनीने प्रियकर दिनेशला 'मी माजलगावला आहे, मला घेऊन जा' असा निरोप दिला. त्यानुसार दिनेश आपल्या दोन मित्रांसह चारचाकी वाहनातून माजलगावात दाखल झाला.

नागरिकांची तत्परता

आंबेडकर चौकातील पंचवटी हॉटेलसमोर दिनेशने सलोनीला गाडीत बसवले. यावेळी सलोनीची बहीण भाग्यश्रीने त्यांना विरोध केला. यामुळे चिडलेल्या दिनेशने भाग्यश्रीलाही बळजबरीने गाडीत बसवून तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराची चाहूल लागताच झालेल्या आरडाओरड्यामुळे आसपासचे नागरिक मदतीला धावून आले. नागरिकांनी तातडीने गाडी अडवून दिनेश आणि त्याच्या दोन साथीदारांना पकडले आणि माजलगाव शहर पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलीस ठाण्यासमोर गर्दी

ही बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि पोलीस ठाण्याबाहेर नागरिकांची मोठी गर्दी जमली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी जमावाला शांत करून पांगवले. या प्रकरणी सलोनीच्या मोठ्या बहिणीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, माजलगाव शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news