

Mahadev Munde murder case MP Sonawane will meet Amit Shah
बीड, पुढारी वृत्तसेवा : परळीतील महादेव मुंडे हत्याकांड प्रकरण दिवसेंदिवस गंभीर वळण घेत आहे. या प्रकरणात आता खासदार बजरंग सोनवणे यांनी थेट उडी घेतली असून, ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबतची माहिती दिली.
चार दिवसांपूर्वी त्यांनी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांना भेट देऊन, तुमच्या लढ्यात मी भाऊ म्हणून खंबीरपणे सोबत आहे, असा शब्द दिला होता. या भेटीनंतर सोनवणे यांनी या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी दिल्लीपासून मुंबईपर्यंत पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त केला. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी थेट आमदार धनंजय मुंडेंनाही टोला लगावला.
२०० दिवसांनी बोलत असल्याचे ते म्हणाले, परंतु त्यांचं बोलणं हे केवळ प्रकृतीचं नव्हे, तर राजकीय व्यूहच आहे, अशी टीका करताना, बीडच्या बदनामीमागची खरी कारणंही त्यांनी स्पष्ट केली. खंडणी, वाळू चोरी, संस्थानांवर कब्जा, प्रॉपर्टी हडपणं. ही बीडच्या बदनामीची मुख्य कारणं आहेत. यामागचे चेहरेही बाहेर यावेत, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी स्व. संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील अद्याप न सापडलेल्या आरोपीकडेही लक्ष वेधले. महादेव मुंडे हत्या प्रकरण ही बीडसाठी लाजीरवाणी बाब आहे.
यात फक्त नावाजलेल्या व्यक्तींवरच गुन्हे नाहीत, तर एका मोठ्या टोळीचा सहभाग असल्याचा संशय आहे, असे सांगून त्यांनी निष्पक्ष तपासाची मागणी केली. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी न्यायासाठी एसपींना वारंवार भेटी दिल्या. परंतु, तपासाच्या गतीवर असंतोष असल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. त्या दुःखदप्रसंगी मी बीडमध्ये नव्हतो, पण नंतर भेटून त्यांना आश्वासन दिलं आहे, असे म्हणत खासदार सोनवणे यांनी पुढील लढ्यात केंद्र सरकारची मदत घेण्याचे संकेत दिले.