

Krishna Maharaj Shastri will be enthroned at Bhagwangad
बीड, पुढारी वृत्तसेवा : संत परंपरेचा वारसा जपणाऱ्या श्री क्षेत्र भगवानगडाच्या इतिहासात आज, दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर नवा अध्याय लिहिला जाणार आहे. गडाच्या स्थापनेला 75 वर्षे पूर्ण होत असलेल्या अमृत महोत्सवी वर्षात श्री कृष्णा महाराज शास्त्री यांची भगवानगडाचे चतुर्थ महंत म्हणून नियुक्ती होणार आहे.
विद्यमान मठाधिपती महंत श्रीगुरू न्यायाचार्य डॉ. श्री नामदेव महाराज शास्त्री बाबा यांच्या हस्ते विधिवत धार्मिक विधींनी त्यांना गादीवर विराजमान करण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे भान ठेवून हा सोहळा भव्य दिव्य स्वरूपात न करता छोटेखानी पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय श्री क्षेत्र भगवानगड ट्रस्टने घेतला आहे.
१९५१ मध्ये दसऱ्याच्या दिवशी ऐश्वर्यसंपन्न संत भगवानबाबांनी श्री क्षेत्र भगवानगडाची स्थापना केली. त्यानंतर भक्ती, ज्ञान आणि वारकरी संप्रदायाच्या परंपरेचा वारसा जपणाऱ्या या गडाने राज्यभरातील लाखो भाविकांच्या मनात श्रद्धेचे स्थान निर्माण केले. यंदा स्थापनेची 75 वर्षे पूर्ण होत असल्याने अमृत महोत्सवी वर्ष आणि त्याच दिवशी नव्या महंतांची नियुक्ती, असा दुग्धशर्करा योग जुळून आला आहे.
त्यामुळे दसऱ्याच्या या सोहळ्याला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. विद्यमान मठाधिपती महंत नामदेव महाराज शास्त्री बाबा यांनी सुमारे दोन वर्षांपूर्वीच आपले उत्तराधिकारी म्हणून कृष्णा महाराज शास्त्री यांची अधिकृत घोषणा केली होती. आता दसऱ्याला त्यांच्याकडे भगवानगडाच्या महंतपदाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. स्वतः नामदेव महाराज शास्त्री बाबा विधिवत धार्मिक विधी पार पाडून त्यांना गादीवर विराजमान करणार आहेत.
बारा वर्षे ज्ञानेश्वरीचे अध्ययन
कृष्णा महाराज शास्त्री हे मूळचे तेलंगणातील असून, सुमारे 17 वर्षापूर्वी ते भगवानगडावर आले. त्यांनी एम.ए. पर्यंत शिक्षण घेतले आहे. भगवानगडावरील ज्ञानेश्वरी विद्यापीठात सलग बारा वर्षे राहून त्यांनी नामदेव महाराज शास्त्री बाबांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वरीसह विविध धार्मिक ग्रंथांचे सखोल अध्ययन केले.