

Kajal Shingare Mumbai Police recruitment
गौतम बचुटे
केज : आई अंगणवाडीत खाऊ शिजविण्याचे काम करीत असून वडील ऊसतोड कामगार म्हणून काम करतात. त्यांचे कष्टाचे सार्थक करत काजल शिनगारे हिने आपल्या प्रयत्न आणि बुद्धीच्या जोरावर मुंबई पोलिस दलात भरती होऊन आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार केले आहे.
केज तालुक्यातील कोरेगाव येथील काजल शिनगारे ही एका सामान्य कुटुंबातील मुलगी आहे. घरात शिक्षणाचा कोणताही वारसा नाही. तिची आई उर्मिला पायाळ-शिनगारे ही अंगणवाडीतील मुलांना खाऊ शिजवून वाटपाचे काम करीत आहे. तर वडील हे ऊसतोड आणि रोजंदारी करीत आहेत. काजल हिने आई वडिलांना मदत करण्यासाठी शाळेत असताना आई वडिलांसोबत ऊस तोडण्याचे काम केले आहे. तसेच तिने लोकांच्या शेतात ट्रॅक्टरने नांगरणी देखील केल्याचे काम केले आहे. घरातील गरिबी आणि कसलेही शैक्षणिक वातावरण नसताना तिने कराटेचे प्रशिक्षण घेतले आहे.
तिचे अनेक दिवसांपासून पोलिसात भरती होण्याचे स्वप्न होते. अगदी भल्या पहाटे उठून ती धावणे आणि व्यायाम करून पोलिस भरतीचा सराव करीत असे. मागे दोन वेळेस तिची पोलिस भरतीत अगदी थोड्या गुणांनी संधी हुकली होती. पण मी एक दिवस पोलिसात भरती होऊन आई वडिलांचे स्वप्न साकार करीन अशी तिने मनाशी खुणगाठ बांधली होती. त्यामुळे तिने पुन्हा नव्याने तयारी सुरू करून मुंबई पोलिस दलात भरती झाली आहे. आई वडील यांचे स्वप्न साकार केले आहे. तिने मिळविलेल्या या यशा बद्दल सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे.
काजल शिनगारे ही मुंबई पोलिस दलात भरती झाल्याची माहिती मिळताच खा. बजरंग सोनवणे यांनी काजल शिनगारे हिचा सत्कार केला. यावेळी सरपंच तांदळे, तिची आई उर्मिला, वडील लक्ष्मण शिनगारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.