

Khokya Bhosale sent to Harsool, police apply to court to get custody
बीड, पुढारी वृत्तसेवा : बीडच्या जिल्हा कारागृहात गांजा वाटून घेण्याच्या कारणातून वाद करणाऱ्या चारही कैद्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. यातील खोक्या भोसले याला संभाजीनगरच्या हर्सूलला पाठवण्यात आले असून उर्वरित तिघांनाही वेगवेगळ्या कारागृहात हलवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
बीड जिल्हा कारागृहातील बॅरेक नंबर चारमधील कैदी खोक्या भोसले, शाम पवार, यमराज राठोड व मोहसिन खान यांच्यात शनिवारी गांजा वाटून घेण्याच्या कारणावरुन वाद झाले होते. यावेळी बंदोबस्तावर असलेल्या कर्मचाऱ्याला देखील या चौघांनी बाहेर आल्यानंतर तुला बघून घेतो अशी धमकी दिल्याच्या प्रकरणात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आता खबरदारीचा उपाय म्हणून या चारही कैद्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. यातील खोक्या भोसले याला संभाजीनगरच्या हार्सल कारागृहात पाठवण्यात आले आहे तर शाम पवार जालना, यमराज राठोड धाराशिव, मोहसिन खान याला परभणी येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास पीएसआय गजानन क्षीरसागर हे करत असून त्यांनी आता कारागृह प्रशासनाकडे सीसीटीव्हीची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणाच्या अधिक तपासासाठी चौघांचा ताबा मिळण्याकरिता न्यायालयाकडे अर्ज केला आहे.
बीड जिल्हा कारागृह गेल्या काही काळापासून सातत्याने वादात सापडलेले आहे. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी एका कैद्याकडे मोबाईल आढळून आला होता. त्यानंतर एका कैद्याकडे गांजाचा साठा मिळून आला होता. या दोन्ही प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर शनिवारी तर हद्दच झाली. गांजा वाटून घेण्याच्या कारणातून कैद्यांनी थेट वाद घालत कर्मचाऱ्यालाच धमक्या दिल्या. कारागृहात अशा प्रकारचे नशेचे पदार्थ, मोबाईल मिळून येत असल्याने या सर्वापाठीमागे रॅकेट सक्रीय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.