

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप आमदार सुरेश धस यांचे कार्यकर्ता सतीश उर्फ खोक्या भोसले आता कायद्याच्या कचाट्यात सापडण्याच्या मार्गावर आहे. वन विभागाने खोक्याच्या घरात झाडाझडती घेतल्यावर मोठ्या प्रमाणावर संशयास्पद वस्तू जप्त केल्या. भोसलेवर शिकारीचा छंद असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांना त्याच्या घरात अनेक अवैध वस्तू सापडल्या आहेत, ज्यात जनावरांचे मांस, शिकारीचे धारदार शस्त्र, जाळी आणि वाघूर यासारख्या वस्तूंचा समावेश आहे. पोलिसांनी त्या सर्व वस्तू जप्त केल्या आहेत.
यामध्ये आश्चर्यजनक म्हणजे, मोर आणि हरिणाच्या शिकारीसाठी वापरली जाणारी जाळीही खोक्याच्या घरात आढळली आहे. याचवेळी खोक्याला अज्ञात व्यक्तीने तयार केलेल्या लॉरेन्स बिश्नोई या फेसबुक अकाउंटवरून धमकी मिळाली आहे. सतीश भोसलेवर मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामुळे तो वादात अडकला आहे. खोक्याने स्वत:च सांगितले की, तो सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. त्याच्यावर शिकारीच्या कारणावरून बापलेकाला मारहाण केल्याचे एक प्रकरण समोर आले आहे. यावेळी, त्याच्यावर आणखी गंभीर आरोप लागल्यामुळे तो सध्या फरार आहे.
आता खोक्या भोसलेला लॉरेन्स बिश्नोईच्या नावावरून एक धमकीची पोस्ट मिळाली आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे, "मी त्याला शिक्षा देईलच, पण तुम्ही (बीड पोलिस) त्याला लवकरात लवकर आत टाका. हरिण आमचं दैवत आहे, त्यामुळे खोक्या माफीच्या लायकीचा नाही." सतीश भोसलेवर उघडकीस आलेल्या आरोपांमुळे शिरुर तालुक्यात तीव्र विरोध होऊ लागला आहे. शिरुरमधील बावी ग्रामस्थांनी त्याच्याविरोधात आक्रमकता दाखवली आहे आणि शिरूर बंदची हाक देण्यात आली आहे.