

केज : केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथील भारतीय सैन्य दलातील जवान राजेंद्र विक्रम मुंडे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर उद्या त्यांच्या जन्म गावी दहिफळ वडमाऊली येथे शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथील राजेंद्र विक्रम मुंडे हे दहा वर्षापासून भारतीय सैन्य दलातील सिग्नल विभागात सेवेत होते. ते आजारी असल्यामुळे दिल्ली येथील सैन्य दलाच्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.
९ जानेवारी रोजी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. दिल्ली येथून त्यांचे पार्थिव १० जानेवारीला रात्री २ वाजेपर्यंत पुणे येथे येणार आहे. त्यानंतर पुणे येथून लष्कराच्या वाहनाने त्यांच्या मुळगावी दहिफळ वडमाउली येथे आणले जाणार आहे. सकाळी ०९.०० वाजता दहिफळ वडमाउली येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांना पोलिसांची मानवंदना देण्यात येणार असून प्रशासनाच्या वतीने तहसीलदार पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. अशी माहिती मिळाली आहे.