

केज : केज तालुक्यातील मस्साजोग येथे असलेल्या आवादा पवन ऊर्जा कंपनीत खंडणी मागणाऱ्या खंडणी खोरांकडून सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. तसेच येथे अनेकवेळा चोऱ्याही झालेल्या असल्याने पोलीस सुरक्षा यंत्रणा पुरवू शकत नसल्याने कंपनीने महाराष्ट्र सुरक्षा बल (एम एस एफ) यांची सशुल्क सुरक्षा घेतली असून आता आवादा कंपनी आणि त्यांच्या सर्व साईडवर त्यांचे अधिकारी आणि कर्मचारी हे सशस्त्र संरक्षणासाठी तैनात करण्यात आले आहेत.
याबाबतची माहिती अशी की, मस्साजोग येथे असलेल्या आवादा पवन ऊर्जा कंपनीचे केज तालुका अनेक ठिकाणी पवन चक्की उभारणीचे काम सुरू आहे. दरम्यान या पवनऊर्जा कंपनीत अनेक वेळा अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना खंडणी मागितल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याच खंडणीच्या प्रकारातून संतोष देशमुख यांनी २ कोटी रू. ची खंडणी मागणाऱ्या खंडणी खोरांना विरोध केल्याने त्यांचे अपहरण करून अत्यंत निर्दयीपणे खून करण्यात आला होता. त्या प्रकरणी तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांच्यासह विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे, महेश केदार, सुधीर सांगळे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे. तर कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे. याच प्रकरणी तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे.
तसेच या ठिकाणी अनेक वेळा चोरीचे प्रकार झाले असून पवन ऊर्जा उभारणीच्या साइट्सवर चोऱ्या होत आहेत. या सर्व प्रकारामुळे कंपनीने पोलिसाकडे पोलीस सुरक्षा मागितलेली होती, परंतु पोलिसाकडे मनुष्यबळ कमी असल्याने त्यांनी त्यांना महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र सुरक्षा बल (एम एस एफ) ची सशस्त्र सुरक्षा सेवा पुरविली आहे. त्यांचे अधिकारी आणि २५ जवान हे रात्रंदिवस कंपनीची सुरक्षा करणार असून साईटवर देखील राहणार आहेत. त्यामुळे आता खंडणीखोरांची खैर नाही.