

केज तालुका : आठवडाभर सुरू असलेल्या पावसामुळे गावागावांत नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. शेतकऱ्यांची पिके हातची गेली असून त्यांना उद्याची चिंता सतावतेय. मात्र गावात राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर छप्पर तरी आहे, अन्नधान्याची सोय आहे. परंतु बीड जिल्हा, केज तालुका आणि आसपासच्या भागात सोयाबीन काढणीसाठी आलेल्या परप्रांतीय मजुरांची अवस्था मात्र अत्यंत हालाखीची झाली आहे.
मध्यप्रदेश, खंडवा, परभणी, अकोला, बुलढाणा आणि गेवराई तालुक्यातून आलेले मजूर सध्या शेतात उभारलेल्या झोपड्यांत थांबले आहेत. पावसामुळे या झोपड्यांत चिखल आणि ओल वाढली आहे. रिकामे बारदाने, खताच्या पिशव्या अंथरून हे मजूर जगण्याचा प्रयत्न करत आहेत. सोबत लहान मुले, वृद्धही आहेत. आठवड्याभरापासून कामधंदा नसल्याने अन्नधान्य संपले आहे. उधारीवर कोणी देण्यास तयार नाही. भिजलेल्या सरपणामुळे चूल पेटवणेही अशक्य झाले आहे. पोटात भुकेचा जाळ पेटलेली लेकरं, आणि दुसरीकडे उपजीविकेचा प्रश्न या मजुरांची अवस्था हृदय पिळवटून टाकणारी आहे.
तहसीलदारांचे प्रयत्न
केज तालुक्यातील साळेगाव येथे शंकर विद्यालय, वीज उपकेंद्र आणि सातेफळ रस्ता परिसरात सुमारे १०० ते १२५ मजूर कुटुंबे राहत आहेत. त्यांची व्यथा पत्रकार गौतम बचुतेटे यांनी तहसीलदार राकेश गिड्डे यांच्यापर्यंत पोहोचवली. त्यानंतर तहसीलदारांनी व्यापारी महासंघाच्या मदतीने या विस्थापित कुटुंबांना सहाय्य करण्याचे नियोजन करण्याचे आश्वासन दिले.
व्यापाऱ्यांचा मदतीचा हात
साळेगाव येथील व्यापारी परमेश्वर लांडगे यांनी प्लास्टिकची पोती उपलब्ध करून दिली. पत्रकार गौतम बचुते, रवि गायकवाड आणि दशरथ राऊत यांनी ती पोती मजुरांपर्यंत पोहोचवली असता, त्यांच्या चेहऱ्यावर थोडा का होईना पण दिलासा दिसून आला.
तहसीलदार गिड्डे यांनी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष महादेव सूर्यवंशी आणि सचिव सुहास चिद्रवार यांना मजुरांची व्यथा सांगितली. त्यानंतर व्यापारी महासंघाने मदतीचा हात पुढे केला आहे.
मजुरांची हळहळ
"साहेब, आमचं इथे कुणी नाही, आता आमचं ऐकणार कोण? अशा चिखल पाण्यात कसं राहावं? आम्ही अडीचशे ते तीनशे किलोमीटरवरून मजुरीसाठी आलो आहोत," असे एका महिला मजुराने अर्धवट हिंदी व तोडक्या मराठीत सांगितले.
तर एका वृद्ध मजुराने व्यथा मांडताना सांगितले, "या आवरणामुळे मालकीण आजारी पडली. आता तिच्यावर उपचार कसे करायचे आणि खायचे काय?"
प्रशासनाची भूमिका
"या विस्थापित मजूर कुटुंबांची माहिती घेतली जात आहे आणि त्यांना मदत करण्यासाठी वरिष्ठांशी संपर्क साधला आहे," असे तहसीलदार राकेश गिड्डे यांनी सांगितले.