

केज ः केज ते कळंब दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या भेगा यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग नसून हा एक भरधाव वेगातील वाहने आणि प्रवासी यांच्यासाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. वारंवार अपघात होत असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात असून हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा अशी मागणी करण्यात येत असली तरी याकडे अधिकारी व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते.
खामगाव-पंढरपूर- सांगोला राष्ट्रीय महामार्ग क्र. 548- सी यावर केज ते साळेगाव आणि कळंब जवळ असलेल्या मांजरा नदीवर पुला जवळ अनेक ठिकाणी रस्ता खचून लोखंडी गज उघडे पडले आहे. ते लोखंडी गज वाहनाच्या टायरमध्ये घुसून भीषण अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तर रस्त्यावर अनेक ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत.
या भेगा मध्ये दुचाकीचे टायर जाऊन दुचाकी चालकांना जीव गमावण्या एवढ्या या भेगा पडलेल्या आहेत. तसेच गावाजवळ दुभाजकावर लावलेल्या लोखंडी जाळ्या भुईसपाट झाल्या आहेत. दुभाजकावर लावलेले पथदिवे अनेक ठिकाणी सुरू करण्यात आले नाहीत आणि पूल आणि दुभाजकाच्या ठिकाणी साईनबोर्ड, सिग्नल याचा अभाव आहे.
या महामार्गावरून दिवसभरात अनेक वाहने ये-जा करीत असतात. तसेच लोकप्रतिनिधी आणि महामार्ग रस्ते विकास मंडळांचे अधिकारी, तसेच प्रशासकीय अधिकारी देखील ये जा करीत असतात मात्र सर्वजण याकडे दुर्लक्ष करतात. एखादी दुर्घटना घडल्यास सर्वजण हळहळ व्यक्त करतात; पण या महामार्गावर घडणाऱ्या संभाव्य अपघात रोखण्यासाठी मात्र कोणीही जबाबदारी घेत नाहीत.
महामार्गावरील अपूर्ण आणि अर्धवट कामे
प्रत्येक पुलावर जम्प असल्याने भरधाव वेगातील वाहने पुलावरून धावताना हेलकावे घेतात.
गावाजवळ बसविलेले पथदिवे हे निव्वळ शोभेच्या वस्तू झालेल्या असून ते सुरू कधी होणार ?
रहदारीला अडथळा निर्माण होऊ नये किंवा अचानक कोणी व्यक्ती, प्राणी, वाहन आडवे येऊ नये म्हणून रस्त्याच्या दोन्ही बाजूला जाळ्या आणि बॅरिकेटिंग बसविलेले नाही.
वाहनचालकाचे लक्ष वेधून घेण्यासाठी बसविलेले पिवळे, लाल हिरव्या रंगाचे रिफ्लेक्टर्स खराब झालेले आहेत.
अनेक ठिकाणी साइड पट्ट्या आणि पंखे खचून चढ उतार तयार झालेले आहेत. त्यामुळे रस्त्याच्या खाली असलेले वाहन रस्त्यावर घेता येत नाही.