International Family Day 2025 |
गेवराई : गजानन चौकटे
आज (१५ मे रोजी) जगभरात जागतिक कुटुंब दिन साजरा होत आहे. "मातृदेवो भवः, पितृदेवो भवः, आचार्य देवो भवः, वसुधैव कुटुंबकम", "हे विश्वचि माझे घर" ही आपली भारतीय संस्कृती आहे. मात्र, परकीयांचे अंधानुकरण, सोशल मीडियाचा वाढता प्रसार आणि ट्रेंडमुळे भारतीय कुटुंबव्यवस्थेला नवी दिशा मिळताना दिसते.
व्हॉट्सअॅप, फेसबुक, इंस्टाग्राम यांसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून नाईलाजाने विभक्त झालेली कुटुंबं पुन्हा एकत्र येतात आणि आभासी कौटुंबिक मैफिली रंगतात. भारतीय कुटुंबपद्धती, प्राचीन परंपरा आणि चालिरितींमुळे आपल्या देशात कुटुंबवत्सलता नैसर्गिक आहे. मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात उद्योगधंदे आणि नोकरीमुळे माणसं शहरांकडे स्थलांतर करत आहेत आणि त्यातून विभक्त कुटुंबांची संकल्पना वाढीस लागली आहे.
महात्मा गांधींनी 'खेड्याकडे चला' असा संदेश दिला होता. स्वातंत्र्यानंतर पहिल्या पंचवार्षिक योजनांमध्ये याचा विचार करून गावखेड्यांच्या विकासासाठी योजना आखल्या गेल्या. परंतु आज लोक शहरांकडे झुकले आणि ‘हम दो, हमारे दो’ या मर्यादित कुटुंब संकल्पनेने जास्तच मूळ धरलं. आजही ग्रामीण भागात तीन-चार पिढ्या एकत्र राहतात, तेथे मुलांवर चांगले संस्कार होतात हे पाहायला मिळते.
आजच्या व्यस्त जीवनशैलीत कुटुंबाला वेळ देणं, संवाद साधणं, एकत्र जेवण करणं सुद्धा दुर्मीळ झालं आहे. जागतिक कुटुंब दिनाच्या निमित्ताने याची जाणीव करून देण्यासाठी, कुटुंबाचं आपल्या मनातलं स्थान जपण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आजच्या दिवशी आपण आपल्या कुटुंबातील प्रत्येकासाठी प्रेम, जिव्हाळा, आणि एकत्रतेचा संकल्प करूया.
आजच्या धावपळीच्या जगात आई-वडील अनेकदा कामात गुंतलेले असतात आणि मुलांना पुरेसा वेळ मिळत नाही. अशा वेळी मुलांना एकटं वाटू लागतं. मात्र, संयुक्त कुटुंब पद्धतीमुळे मुलं भावंडांबरोबर संवाद साधतात, त्यांचे प्रश्न शेअर करतात आणि कुटुंबातील प्रत्येक आनंद द्विगुणित होतो. माझी आई, पत्नी, तीन भावंडं, भावजय, पुतण्या-पुतण्या असे आम्ही ११ जण एकत्र कुटुंबात राहतो. याचा आम्हाला अभिमान वाटतो.”
सखाराम शिंदे, गेवराई (ज्येष्ठ पत्रकार)