बीड, पुढारी वृत्तसेवा: शहरातील एका लॉजमध्ये दोन वेगवेगळ्या समाजाचे तरुण-तरुणी असल्याची अफवा पसरताच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमाव जमला. या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. या प्रकरणात आता धुडगूस घालणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. शुक्रवारी दुपारी बार्शी रोड परिसरात हा प्रकार घडला.
शहरातील एका नामांकित लॉजमध्ये शुक्रवारी दुपारच्या सुमारास दोन तरुण व दोन तरुणी गेले. यावेळी बाहेर असलेल्या काही लोकांना हे वेगवेगळ्या समाजाचे असल्याचा समज झाला. यानंतर काही वेळातच या लॉजबाहेर मोठा जमाव एकत्र आला.
याबाबतची माहिती बीड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ व सहकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी त्या ठिकाणी दाखल होत जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. तसेच लॉजमध्ये थांबलेल्या तरुण-तरुणींची चौकशी केली असता ते एकाच समाजाचे असल्याचे समोर आले. यानंतर अधिक चौकशीसाठी त्यांना पोलिस व्हॅनमध्ये बसवून घेऊन जात असताना जमलेल्या जमावाने या तरुण-तरुणींना मारहाण करण्याचा प्रयत्न केला.
पोलिस गाडीचा दरवाजा उघडण्याचा तसेच गाडी अडवण्याचा देखील प्रयत्न झाल्याने पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला. या घटनेमुळे बार्शी रोडवरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
शेख वाजेद शेख साजेद, शेख अखील शेख नवाब, शेख अशील शेख पाशा, सय्यद जावेद सय्यद बशीर, शेख शोएब शेख जियाउद्दीन, सय्यद मोहसीन सय्यद मोयनोद्दौर, सय्यद मुजाहेत सय्यद एजाज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
शहरात हॉटेलमध्ये वास्तव्यासाठी रुम देताना नियमांचे उल्लंघन केले जात आहे. भविष्यात असे प्रकार होऊ नयेत याकरिता लॉजची तपासणी केली जाणार असून नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी सांगितले.