Heatstroke Beed News| गेवराई उपजिल्हा रुग्णालयात उष्मघातासाठी सुसज्ज विशेष कक्ष; नागरिकांना दिलासा

गंभीर रुग्णांना तात्काळ पुढील उपचारासाठी उच्चस्तरीय रुग्णालयात हलविण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे
Heatstroke Beed News
Heatstroke Beed News
Published on
Updated on

गेवराई : तालुक्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर संभाव्य उष्मघाताच्या घटनांना तोंड देण्यासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा असलेला उष्मघात (हीट स्ट्रोक) विशेष कक्ष सुरू करण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार ही उपाययोजना करण्यात आली असून नागरिकांना वेळेत उपचार मिळावेत, हा यामागील प्रमुख उद्देश आहे.

उपजिल्हा रुग्णालयातील या विशेष कक्षामध्ये थंडावा राखण्यासाठी कूलर, पंखे आदि व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच रुग्णांसाठी स्वतंत्र बेड, सलाईन स्टँड, ऑक्सिजन सिलिंडर, जीवनावश्यक औषधे आणि आपत्कालीन उपचारासाठी लागणारी सर्व साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. उष्मघाताच्या रुग्णांवर तातडीने उपचार करता यावेत यासाठी डॉक्टर, नर्स व आरोग्य कर्मचारी यांची विशेष टीम नियुक्त करण्यात आली आहे.

उष्मघाताची लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांवर जलदगतीने उपचार करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने स्वतंत्र प्रोटोकॉल तयार केला आहे. रुग्ण आल्याबरोबर त्यांचे शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी थंड पाण्याच्या पट्ट्या, सलाईनद्वारे द्रवपदार्थ देणे, तसेच आवश्यकतेनुसार ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. गंभीर रुग्णांना तात्काळ पुढील उपचारासाठी उच्चस्तरीय रुग्णालयात हलविण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

दरम्यान, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नागरिकांना उष्माघातापासून बचाव करण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. सकाळी ११ ते दुपारी ४ या कालावधीत अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, बाहेर जाताना डोक्यावर टोपी, अंगावर सैल व हलक्या रंगाचे कपडे वापरावेत, तसेच भरपूर पाणी, ताक, लिंबूपाणी यांसारखे द्रवपदार्थ सेवन करावे, असे सांगण्यात आले आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

उष्मघाताची लक्षणे जसे की चक्कर येणे, मळमळ, उलट्या, शरीराचे तापमान वाढणे, घाम कमी येणे किंवा बेशुद्धावस्था आढळल्यास त्वरित जवळच्या रुग्णालयात दाखल व्हावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. या विशेष कक्षाच्या स्थापनेमुळे तालुक्यातील नागरिकांना उष्मघातासारख्या आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ व परिणामकारक उपचार मिळणार असून संभाव्य जीवितहानी टाळण्यास मोठी मदत होणार असल्याचा विश्वास आरोग्य प्रशासनाने व्यक्त केला आहे.

“उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता उष्मघाताच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात विशेष कक्ष स्थापन करून सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. नागरिकांनी दुपारच्या कडाक्याच्या उन्हात बाहेर जाणे टाळावे, भरपूर पाणी व द्रवपदार्थ घ्यावेत आणि उष्मघाताची लक्षणे दिसताच तात्काळ रुग्णालयात संपर्क साधावा.” –

‌ डॉ. सुरज कोठावळे वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय, गेवराई.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news