

बीड, पुढारी वृत्तसेवा : Hanuman Jayanti 2025 | गावोगावी हनुमंताचे मंदिर आणि त्याला जोडली गेलेली आख्यायिका वेगवेगळी ऐकायला मिळते. बहुतांश गावांमध्ये हनुमंताची एकच मूर्ती असते. परंतु, बीड तालुक्यातील पेंडगावमध्ये मात्र एकाच मंदिरात हनुमंताच्या दोन मूर्ती आहेत. बीडसह जिल्हाभरातील भाविक या ठिकाणी दर शनिवारी तसेच हनुमान जयंतीला मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात.
बीडपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर पेंडगाव हे तीर्थक्षेत्र असून या ठिकाणी हनुमंताचे प्राचीन मंदिर आहे. सोलापूर - धुळे महामार्गाजवळ हे मंदिर असल्याने या ठिकाणी नेहमीच भाविकांची वर्दळ असते. विशेषत: दर शनिवारी या ठिकाणी भाविकांकडून प्रसादाचे आयोजन केले जाते. या ठिकाणी दर्शनासाठी येणारे भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात. या ठिकाणचे वैशिष्ट्य म्हणजे, येथील मंदिरात हनुमंताच्या दोन मूर्ती आपल्याला दिसून येतात. यामध्ये एक गावचा मूळचा हनुमंत आहे. तर गावातील काही लोक काशी येथे दर्शनासाठी जात होते. तेथील हनुमंत पेंडगावमध्ये आल्याची आख्यायिका गावकरी सांगतात. हे अतिशय जागृत देवस्थान असून या ठिकाणी राज्यभरातील लोक नवस बोलण्यासाठी येतात. या ठिकाणी शासकीय निधीतून तसेच ग्रामस्थ व भाविकांच्या योगदानातून विकास कामेदेखील मोठ्या प्रमाणावर होत आहेत.
हनुमान जयंतीला प्रत्येक वर्षी या ठिकाणचे तरुण श्री. क्षेत्र काशी येथून गंगेचे पाणी आणतात. यावर्षी देखील हे तरुण पाणी आणण्यासाठी गेले आहेत. हनुमान जयंतीनिमित्त या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहदेखील आयोजित करण्यात आला असून या ठिकाणी नामवंत किर्तनकाराचे किर्तन होत आहेत.